वॉशिंग्टन : टेस्ला, एक्स आणि स्पेसएक्ससारख्या दिग्गज कंपन्यांचे सर्वेसर्वा व धडाडीचे, कल्पक उद्योजक एलन मस्क यांनी एक अशी कल्पना मांडली आहे, ज्यामुळे अंतराळाचा वापर नव्या पद्धतीने करण्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मस्क यांनी एका अशा तंत्रज्ञानामध्ये रस दाखवला आहे, जे अंतराळात डेटा सेंटर्स तयार करू शकते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ची मागणी वाढत असल्याने, कॉम्प्युटिंग स्टोरेज आणि प्रोसेसिंग पॉवरची गरज मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही वाढती गरज लक्षात घेऊन जगभरात डेटा सेंटर्स उभारण्याचे काम सुरू आहे. भारतसुद्धा मोठे डेटा सेंटर्स उभारणार आहे. परंतु, पृथ्वीसोबतच अंतराळातही डेटा सेंटर्स तयार करण्याची कल्पना आता जोर धरू लागली आहे. स्टारक्लाऊड नावाच्या स्टार्टअपसह, गूगलचे माजी सीईओ एरिक श्मिट आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनीही या क्षेत्रात आपला रस दाखवला आहे. आता एलन मस्क यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मस्क यांनी सांगितले आहे की, ते स्टारलिंक (डींरीश्रळपज्ञ) त3 उपग्रहांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून अंतराळात डेटा सेंटर्स बनवू शकतात. जर हे शक्य झाले, तर जगाला अनेक फायदे मिळू शकतात. काही तज्ज्ञ या कल्पनेला जास्त महत्त्व देत नाहीत. डेटा सेंटर बनवण्यासाठी अंतराळात ज्या संरचनेची गरज आहे, सध्याचे तंत्रज्ञान त्यासाठी पुरेसे नाही, असे त्यांचे मत आहे; पण हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, काही वर्षांपूर्वी उपग्रह इंटरनेटची कल्पना कोणीही केली नव्हती, जी मस्क यांची कंपनी स्टारलिंक आणि इतर कंपन्यांनी सत्यात उतरवली आहे. क्विल्टी स्पेस नावाच्या कंपनीचे रिसर्च डायरेक्टर कॅलेब हेन्री यांनी एका अहवालात सांगितले की, जर या दिशेने गुंतवणूक केली गेली, तर अंतराळात होत असलेल्या कामांमध्ये मोठा बदल नक्कीच पाहायला मिळेल. डेटा सेंटरचे मुख्य कार्य डेटा साठवणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि त्याचे प्रसारण करणे असते. अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर लक्षात घेता डेटा सेंटर्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अंतराळातील डेटा सेंटर्सचे फायदे
पृथ्वीवर डेटा सेंटर्स बनवल्याने सध्या होणारे पर्यावरणीय नुकसान टळेल. डेटा सेंटर्स चालवण्यासाठी लागणारा पाण्याचा प्रचंड वापर टाळता येईल व पाण्याची बचत होईल. अंतराळात अमर्याद सौर ऊर्जा उपलब्ध होते. सूर्यप्रकाशाच्या अशा विनामूल्य आणि अमर्याद ऊर्जेचा वापर करून हे सेंटर्स चालवता येतील.