Elon Musk | ‘माझी पार्टनर अर्धी भारतीय आहे...’  
विश्वसंचार

Elon Musk | ‘माझी पार्टनर अर्धी भारतीय आहे...’

वंशवादी नसल्याची एलन मस्क यांच्याकडून स्पष्टोक्ती

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेक उद्योजक एलन मस्क आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा मस्क यांच्या एका वक्तव्याची जगभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका मुलाखतीदरम्यान मस्क यांनी स्वतःवर लागलेले वंशवादाचे (वर्णद्वेष) सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्विटर) वरील आपल्या वक्तव्यांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या मस्क यांनी आपल्या बचावात स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि ‘भारतीय कनेक्शन’चा दाखला दिला.

‘द इकॉनॉमिस्ट’च्या संपादक जेनी मिंटन बेडॉस यांना दिलेल्या मुलाखतीत मस्क यांना त्यांच्या वादग्रस्त पोस्टस्‌ आणि उजव्या विचारसरणीकडे झुकण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना मस्क यांनी आपल्या ‘न्यूरालिंक’ या टेक कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह आणि पार्टनर शिवोन जिलिस यांचा उल्लेख केला. मस्क म्हणाले, माझी पार्टनर अर्धी भारतीय आहे आणि तिच्यापासून मला चार मुले आहेत. यातील एका मुलाचे नाव एका प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञाच्या नावावर ठेवले आहे. त्यामुळे मी वर्णद्वेषी किंवा वंशवादी आहे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.

मस्क आणि शिवोन जिलिस यांच्या मुलाचे पूर्ण नाव ‘स्ट्राइडर शेखर’ (Strider Sekhar) असे आहे. मस्क यांनी याआधीही खुलासा केला होता की ‘स्ट्राइडर’ हे नाव प्रसिद्ध कादंबरी ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स’मधील पात्रावरून घेण्यात आले आहे. ‘शेखर’ हे नाव १९८३ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जिंकणारे महान भारतीय-अमेरिकन खगोल भौतिकशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. मस्क यांनी दावा केला की, त्यांच्या टेस्ला, स्पेसएक्स आणि न्यूरालिंक या कंपन्यांमध्ये सर्व धर्म आणि वंशाचे लोक उच्च पदांवर कार्यरत आहेत. तिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही.

ब्रिटनसारख्या देशांमधील स्थलांतरावर बोलताना मस्क यांनी स्पष्ट केले की, त्यांची चिंता वंश किंवा धर्माबाबत नसून सांस्कृतिक मूल्यांबद्दल आहे. जे लोक पाश्चात्त्य देशांचे नियम, स्वातंत्र्य आणि कायद्यांच्या विरोधात विचार ठेवतात, त्यांनाच त्यांचा विरोध आहे. राजकीय मुद्द्यांव्यतिरिक्त मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि रोबोटिक्सच्या भविष्यावरही भाष्य केले. सुरुवातीला ‘एआय’ला मानवतेसाठी धोका मानणाऱ्या मस्क यांची भूमिका आता काहीशी बदललेली दिसत आहे. मस्क यांनी मान्य केले की ‘एआय’मध्ये धोके नक्कीच आहेत. परंतु आता याचा वेग रोखणे कोणत्याही देशाच्या किंवा व्यक्तीच्या हातात राहिलेले नाही. मस्क यांच्या मते, ‘एआय’ आणि रोबोटिक्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भविष्यात प्रत्येकासाठी मुबलक संसाधने आणि समृद्धी उपलब्ध होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT