वॉशिंग्टन : इलेक्ट्रिक कार असोत वा हायपरलूप तंत्रज्ञान, मंगळावरील वस्तीसाठी अंतराळ संशोधन असोत वा ट्विटर. एलन मस्क जे हातात घेतात त्यात काहीतर ‘हटकेपणा’ करतात. आता मस्क यांनी एक असं प्रोजेक्ट तयार केलंय जे संपूर्ण मानवजातीसाठी वरदान ठरू शकतं. मस्क यांनी एक असं प्रोजेक्ट सुरू केलंय ज्याद्वारे मानवी मेंदूत चीप बसवली जाणार आहे. या चीपद्वारे मनुष्याला नवी ताकद मिळणार आहे. मस्क यांच्या चीपमुळे वैज्ञानिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.20 वर्ष विकलांग स्थितीत असलेल्या महिलेच्या मनात काय चाललयं, हे ती न बोलता समजलं आहे.
जगात पहिल्यांदाच एका महिलेने तिच्या विचारांच्या ताकदीने संगणक नियंत्रित केला आहे. गेल्या 20 वर्षांपासून अर्धांगवायू झालेल्या अमेरिकेच्या ऑड्रे क्रूज या महिलेने न्यूरालिंक ब्रेन इम्प्लांटच्या मदतीने काहीही स्पर्श न करता संगणकावर तिचे नाव लिहिले आहे. ऑड्रे क्रूज या 20 वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्या शरीरात कोणत्याही हालचाली नाहीत. कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय तिने मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी माऊस पकडला नाही की कर्सर हलवला नाही! या तंत्रामध्ये केवळ टेलिपथीद्वारे संगणक चालवतो.
याच टेलीपथीच्या मदतीने ऑड्रे क्रूज या महिलेने हृदय, चेहरे, पक्षी आणि पिझ्झाचे रंगीत डूडल बनवत चित्रांच्या मदतीने तिच्या मनात काय सुरू आहे, हे सांगितले. मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीनं 2016 पासूनच मानवी मेंदूत कॉम्प्युटर चीप बसवण्याच्या प्रोजेक्टचं काम सुरू केलं होतं. मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास अनेक मानवी विकारांवर मात करणं शक्य होईल. अर्धांगवायू, मेंदू विकार, अल्झायमर, पाठीच्या कण्याच्या दुखापती दूर करता येतील. शिवाय, स्मृतिभ्रंश, नैराश्य, निद्रानाश या विकारांवरही मात करता येईल, अशी माहिती न्यूरालिंकमधल्या सूत्रांनी दिली.