World First Trillionaire | एलन मस्क बनले जगातील पहिले ‘ट्रिलियनेयर’  Pudhari File Photo
विश्वसंचार

World First Trillionaire | एलन मस्क बनले जगातील पहिले ‘ट्रिलियनेयर’

संपत्ती ९१ लाख कोटींच्या पार; ‘आयपीओ’मधून उभारले ७५ अब्ज डॉलर्स

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन डी. सी. : अनिल टाकळकर

जगाच्या कॉर्पोरेट इतिहासात एका अशा नव्या अध्यायाची भर पडली आहे, ज्याची कल्पना काही वर्षांपूर्वीपर्यंत करणेही अशक्य वाटत होते. दिग्गज उद्योगपती एलन मस्क हे आता अधिकृतपणे जगातील पहिले ‘ट्रिलियनेयर’ (Trillionaire) म्हणजेच १,००० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेले व्यक्ती बनले आहेत. इंटरनेट आणि सोशल मीडिया संस्कृतीचा एक मोठा चेहरा असलेले मस्क हे यश संपादन करणारे जगातील पहिलेच अब्जाधीश ठरले आहेत. जगात श्रीमंत आणि गरिबांमधील वाढत्या दरीवरून वाद सुरू असतानाच मस्क यांनी हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

‘स्पेेसएक्स’च्या ‘आयपीओ’ने इतिहास रचला

एलन मस्क यांच्या अंतराळ संशोधन कंपनी ‘स्पेसएक्स’ने गुरुवारी आपल्या ‘आयपीओ’च्या माध्यमातून बाजारातून तब्बल ७५ अब्ज डॉलर्स उभे केले. त्यांच्या कंपन्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर आणि राजकारणातील वाढत्या हस्तक्षेपावर अनेकदा वाद निर्माण झाले, तरीही मस्क यांच्या साम्राज्याला आणि त्यांच्या दूरदृष्टीवर असलेल्या जागतिक गुंतवणूकदारांच्या विश्वासाला कोणताही धक्का लागलेला नाही, हेच या ‘आयपीओ’च्या यशाने दाखवून दिले.

मस्क इतरांपेक्षा बरेच पुढे

‘स्पेेसएक्स’च्या ‘आयपीओ’पूर्वी ‘फोर्ब्स’ मासिकाने मस्क यांची एकूण संपत्ती ७८० अब्ज डॉलर्स एवढी अंदाजित केली होती. या आकड्यासह ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होतेच. मात्र, आता दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अल्फाबेट (गुगल) चे सहसंस्थापक लॅरी पेज यांच्यापेक्षा मस्क कित्येक पटीने पुढे गेले आहेत. लॅरी पेज यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलर्स आहे, जी मस्क यांच्या एकूण दौलतीच्या एकतृतीयांशपेक्षाही कमी आहे.

शुक्रवारी बाजारात इतिहास घडला

‘स्पेेसएक्स’च्या लिस्टिंगनंतर मस्क यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा हिस्सा याच कंपनीतून येतो, ज्यामध्ये त्यांची भागीदारी सुमारे ८६६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. ‘टेस्ला’ आणि त्यांच्या इतर कंपन्यांचा हिस्सा मिळून शुक्रवारी जेव्हा बाजारात ट्रेडिंग सुरू झाले, तेव्हा मस्क यांच्या एकूण संपत्तीने १.१ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ९१ लाख कोटी रुपये) चा टप्पा पार केला. मस्क यांनी यापूर्वी ‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’च्या माध्यमातून जगभरात ओळख निर्माण केली होती, तर २०२२ मध्ये त्यांनी ४४ अब्ज डॉलर्सला ‘ट्विटर’ (आताचे एक्स‍) खरेदी करून जगाला चकित केले होते.

‘स्पेसएक्स’ने मारली बाजी

एलन मस्क आपल्या ‘स्पेसएक्स’ कंपनीला शेअर बाजारात उतरवणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती. हा ‘आयपीओ’ बाजारात येताच गुंतवणूकदारांनी त्यावर पैशांचा पाऊस पाडला. बाजार तज्ज्ञांचा असा अंदाज होता की, मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी ‘टेस्ला’ त्यांना ‘ट्रिलियनेयर’ बनवेल; परंतु प्रत्यक्षात ‘स्पेसएक्स’ने बाजी मारली. कंपनीचा ‘स्टारलिंक’ सॅटेलाईट इंटरनेट व्यवसाय आणि भविष्यातील ‘मंगळ ग्रह मोहीम’ याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

‘ट्रिलियनेयर’ म्हणजे

नक्की काय?

सोप्या भाषेत सांगायचे, तर

१ ट्रिलियन डॉलर्स (१,०००,०००,०००,००० USD) ही इतकी मोठी रक्कम आहे जी जगातील तैवानसारख्या अनेक विकसित देशांच्या एकूण जीडीपीपेक्षाही जास्त आहे. भारतीय रुपयात ही रक्कम ९१ लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक होते. या ऐतिहासिक कमाईसह एलन मस्क यांनी ‘ॲमेझॉन’चे जेफ बेझोस आणि बर्नार्ड अर्नाल्ट यांच्‍यासारख्या बलाढ्य अब्जाधीशांना खूप मागे टाकले आहे. ‘एक्‍स’ (ट्विटर) खरेदीनंतरचे वाद आणि ‘टेस्ला’च्या शेअर्समधील चढ-उतार या सर्व आव्हानांवर मात करत मस्क यांनी अव्वल स्थान सिद्ध केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT