वॉशिंग्टन : तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधीश एलन मस्क यांनी पुन्हा एकदा आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) कंपनी ‘ओपन एआय’ वर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी कंपनीला ‘खोट्यावर आधारित’ (built on a lie) असे म्हटले आहे. ‘ओपन एआय’च्या माजी बोर्ड सदस्य हेलेन टोनर यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीबद्दल आपले मत व्यक्त केल्यानंतर मस्क यांनी ही टिप्पणी केली.
हेलेन टोनर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (टि्वटर) वर लिहिले, ‘कधीकधी’ओपन एआय’ चे कर्मचारी मला विचारतात की मी आता कंपनीकडे कसे पाहते. सिस्टम कार्डस् बनवणे किंवा CoT मॉनिटरिंग यांसारख्या काही गोष्टी चांगल्या आहेत, परंतु धोरणाशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांची बेईमानी आणि भीती दाखवण्याची रणनीती चिंताजनक आहे.’ मस्क यांनी हे पोस्ट रिटि्वट करत लिहिले, ‘OpenAI is built on a lie’, म्हणजेच ‘ओपन एआय’ एका खोट्यावर आधारित आहे.
या टि्वटनंतर सोशल मीडियावर लोकांनी प्रश्न उपस्थित केला की, ‘ओपन एआय’ ही एक नॉन-प्रॉफिट (ना-नफा) संस्था नव्हती का? यावर मस्क यांनी उत्तर दिले, ‘त्यांनी एक चॅरिटी चोरली आणि तिचा वापर त्यांच्या वैयक्तिक नफ्यासाठी केला.’ मस्क यांनी ‘ओपन एआय’वर असा आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यातही मस्क यांनी ‘ओपन एआय’च्या कथित योजनेवर टीका केली होती, ज्यामध्ये कंपनी आपल्या नॉन-प्रॉफिट संरचनेला ‘फॉर-प्रॉफिट’ (नफा मिळवणार्या) संस्थेमध्ये बदलण्याचा विचार करत होती.
मस्क म्हणाले होते की, ‘तुम्ही कोणत्याही नॉन-प्रॉफिट संस्थेला थेट फॉर-प्रॉफिटमध्ये बदलू शकत नाही, हे अवैध आहे.’ एका अहवालानुसार, या प्रस्तावित बदलांतर्गत ‘ओपन एआय’चे सीईओ सॅम ऑल्टमन यांना कंपनीत सुमारे 7 टक्के हिस्सा मिळण्याची शक्यता आहे. सन 2015 मध्ये ‘ओपन एआय’ची सुरुवात सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने ‘एआय’ संशोधन करण्याच्या उद्देशाने गैर-लाभकारी संस्था म्हणून झाली होती. परंतु 2019 मध्ये कंपनीने OpenAI LP नावाच्या एका नफा कमावणार्या उपकंपनीची (Profitable Subsidiary) स्थापना केली, ज्यामुळे तिला मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांकडून गुंतवणूक मिळण्यास मदत झाली. इथूनच वादाची सुरुवात झाली आणि आता मस्क कंपनीवर वारंवार चॅरिटीचे रूपांतर खासगी नफ्यात केल्याचा आरोप करत आहेत.