लखनौ : उत्तर प्रदेशातील बरेली येथे असलेल्या भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (IVRI) येथील वैज्ञानिकांनी कर्करोगाच्या निदानासाठीच्या नव्या संशोधनात मोठे यश मिळवले आहे. वैज्ञानिकांनी केवळ रक्ताच्या नमुन्यातूनच कर्करोगाचा शोध घेणारी ‘मल्टिपल एलिसा किट’ (Multiple ELISA Kit) विकसित केली आहे. या किटची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती रोगाला प्रारंभिक अवस्थेतच पकडू शकते आणि फक्त सहा तासांच्या आत त्याचे परिणाम देते.
मुख्य वैज्ञानिक डॉ. सोनल, डॉ. समीर श्रीवास्तव आणि त्यांच्या चमूने सात वर्षांच्या अथक संशोधनानंतर ही किट तयार करण्यात यश मिळवले आहे. डॉ. सोनल यांच्या मते, कर्करोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर रोगाची ओळख होणे खूप महत्त्वाचे आहे. विकसित केलेली ‘मल्टिपल अँटिजन एलिसा किट’ कर्करोगाशी संबंधित अनेक ‘बायोमार्कर’ एकाच वेळी ओळखण्यासाठी डिझाईन केली गेली आहे. ही किट रक्ताच्या नमुन्याची तपासणी करून कर्करोगाच्या सुरुवातीची शक्यता दर्शवते.
सुरुवातीला, या किटची चाचणी कुत्र्यावर करण्यात आली, जिथे त्याचे परिणाम यशस्वी ठरले. त्यानंतर, ज्येष्ठ कर्करोग विशेषज्ञ डॉ. आरके चितलांगिया यांच्या सहकार्याने मानवाच्या 100 रक्ताच्या नमुन्यांवरही तिची चाचणी करण्यात आली, ज्यांचे निकालही सकारात्मक होते. डॉ. चितलांगिया यांनी आता या संशोधनाला पुढे नेण्यासाठी आणि सुमारे दीड ते दोन हजार लोकांच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे सुचवले आहे. वैज्ञानिकांचे मत आहे की, ही किट नेहमीच्या तपासणीमध्ये देखील वापरली जाऊ शकते. कर्करोगाची ओळख जितक्या लवकर होईल, रुग्णावरचा उपचार तितकाच प्रभावी होईल. याव्यतिरिक्त, वैज्ञानिक प्रयोगशाळेत कर्करोग प्रतिबंधक लस आणि विशेष उपचार पद्धती बनवण्यावरही संशोधन करत आहेत.