Elephant Intelligence | साथीदाराच्या मृत्यूच्या जागेची हत्तींना राहते आठवण  
विश्वसंचार

Elephant Intelligence | साथीदाराच्या मृत्यूच्या जागेची हत्तींना राहते आठवण

पुन्हा पुन्हा परततात त्याच ठिकाणी

पुढारी वृत्तसेवा

नैरोबी : हत्तींच्या वर्तनावर करण्यात आलेल्या एका ताज्या अभ्यासात या महाकाय वन्यजीवाबद्दल अत्यंत थक्क करणारी माहिती समोर आली आहे. हत्ती नेहमीच त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि वर्तनाने मानवाला आश्चर्यचकित करत आले आहेत. हत्ती कळपात राहतात आणि त्यालाच आपले कुटुंब मानतात. हत्तींची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते आपल्या मृत साथीदारांबद्दल आदर व्यक्त करतात. ते आपल्या मृत साथीदाराला दीर्घकाळ लक्षात ठेवतात आणि त्याच्या अवशेषांच्या ठिकाणी काही महिन्यांनंतरही पुन्हा पुन्हा भेट देतात.

हत्तींच्या या वर्तनाला त्यांची ‘स्मशानभूमी’ मानणे किंवा मृत साथीदाराचा शोक पाळणे म्हटले जाते. हत्ती आपल्या प्रजातीतील मृत सदस्यांच्या अवशेषांबद्दल खूप उत्सुक असतात आणि त्यांच्यात विशेष रस दाखवतात याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत. ऑगस्ट २०२६ मध्ये ‘आफ्रिकन जर्नल ऑफ इकॉलॉजी’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात हत्तींच्या या वर्तनाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. संशोधकांनी दक्षिण केनियामध्ये बऱ्याच काळापूर्वी मृत पावलेल्या एका सवाना हत्तीच्या अवशेषांजवळ कॅमेरा लावला होता. अवघ्या साडेतीन महिन्यांच्या काळात तेथे हत्तींचे कळप तब्बल ३४ वेळा आल्याचे मुव्हमेंट रेकॉर्ड झाले. हत्ती तेथे येऊन वारंवार हाडांना स्पर्श करत होते आणि ती हुंगत होते.

‘बायोलॉजी लेटर्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका प्रयोगात संशोधकांनी आफ्रिकन हत्तींसमोर हत्तीची कवटी, सुळे आणि इतर प्राण्यांची हाडे ठेवली. हत्तींनी इतर कोणत्याही सस्तन प्राण्यांच्या अवशेषांपेक्षा स्वतःच्या प्रजातीच्या अवशेषांमध्ये अधिक रस दाखवला. यावरून सिद्ध होते की, हत्ती केवळ कोणत्याही नवीन वस्तूबद्दल उत्सुकता दाखवत नाहीत, तर त्यांच्यासाठी हत्तींच्या अवशेषांचे एक विशेष आणि भावनिक महत्त्व असते. हे वर्तन केवळ आफ्रिकन हत्तींपुरतेच मर्यादित नसून आशियाई हत्तींमध्येही पाहायला मिळते. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ (IISc) आणि ‘क्योटो युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी आशियाई हत्तींच्या तीन अशा घटनांची नोंद केली आहे, जिथे हत्ती आपल्या मृत किंवा मरणासन्न साथीदाराजवळ गेले आणि त्यांनी हुंगून त्यांची तपासणी केली. तसेच, प्राणिसंग्रहालयातील हत्तींवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, कळपातील सदस्याच्या मृत्यूनंतर हत्तींचे वर्तन आणि त्यांच्या सामाजिक संबंधांमध्ये मोठे बदल घडून येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT