Elephant Intelligence | हत्ती विचारपूर्वक करतात मोह, भावनांवर मात!  
विश्वसंचार

Elephant Intelligence | हत्ती विचारपूर्वक करतात मोह, भावनांवर मात!

पुढारी वृत्तसेवा

बँकॉक : माणसांप्रमाणेच हत्ती हेसुद्धा अतिशय सामाजिक आणि हुशार प्राणी म्हणून ओळखले जातात. मात्र, तरुण मानवांपेक्षा वेगळे म्हणजे ‘आशियाई हत्ती’ कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण विचार करू शकतात, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. ते कोणत्याही मोहाला किंवा भावनेला बळी न पडता सारासार विचार करूनच पाऊल उचलतात, असे या संशोधनात आढळले.

थायलंडमधील ‘नॅशनल एलिफंट इन्स्टिट्यूट’मधील १६ आशियाई हत्तींनी एका ‘डिटूर टेस्ट’मध्ये यशस्वीपणे सहभाग घेतल्यानंतर संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. या चाचणीमध्ये प्राण्याला खाऊ मिळवण्यासाठी एका साध्या पण अकार्यक्षम इच्छेवर ताबा मिळवून, दुसऱ्या एका अप्रत्यक्ष पण प्रभावी मार्गाचा वापर करावा लागतो. या क्षमतेला विज्ञानात ‘इन्हिबिटरी कंट्रोल’ (भावना किंवा इच्छेवर ताबा मिळवण्याची क्षमता) असे म्हणतात. न्यू यॉर्कमधील हंटर कॉलेजच्या संशोधक सिडनी होप यांनी ‘पॉप्युलर सायन्स’ला सांगितले, “हत्ती किती बुद्धिमत्ता बाळगून असतात, हे आता कुठे आपल्याला समजायला लागले आहे; पण त्यांच्यातील या ‘इन्हिबिटरी कंट्रोल’ क्षमतेबद्दल आपल्याला अजून फार कमी माहिती आहे.

हत्तींच्या या क्षमतेचा अभ्यास केल्याने माणसांसह इतर प्राण्यांमध्ये ही संज्ञानात्मक क्षमता कशी विकसित झाली, हे समजण्यास मदत होईल. तसेच मानवनिर्मित आणि पर्यावरणीय बदलांशी हत्ती कसे जुळवून घेतात, हे समजणेही सोपे होईल.” ‘प्लॉस वन’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी हत्तींसमोर फळांनी भरलेला एक पारदर्शक बॉक्स ठेवला होता. या बॉक्सला लहान-लहान छिद्रे होती, ज्यातून हत्ती आत ठेवलेली फळे पाहू शकत होते आणि त्यांचा वास घेऊ शकत होते. हत्तींसाठी सर्वात मोठा मोह हा होता की, त्यांनी थेट त्या छिद्रांमधून सोंड आत टाकून फळे काढण्याचा प्रयत्न करणे. मात्र, छिद्रे लहान असल्याने सोंड आत जाऊ शकत नव्हती. हत्तींनी आपल्या मोहावर पूर्ण ताबा मिळवला आणि थेट छिद्रांमधून प्रयत्न करण्याऐवजी बॉक्सच्या बाजूला असलेल्या मोठ्या दरवाजाचा वापर केला, जसे त्यांना आधी शिकवण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT