Rajdhani Express Incident | राजधानी एक्स्प्रेससमोर अचानक आला हत्तींचा कळप आणि... 
विश्वसंचार

Rajdhani Express Incident | राजधानी एक्स्प्रेससमोर अचानक आला हत्तींचा कळप आणि...

पुढारी वृत्तसेवा

गुवाहाटी : आसामच्या जंगलात राहणारे जंगली हत्ती मानवी वस्तीजवळ किंवा रेल्वे ट्रॅकवर येणे नवीन नाही. परंतु, जेव्हा हत्तींचा कळप रेल्वे ट्रॅकवर येतो आणि त्याचवेळी अतिशय वेगाने धावणारी ट्रेन तिथे पोहोचणार असते, तेव्हा मोठा अपघात होण्याचा धोका असतो. बुधवारी सकाळी आसामच्या होजाई जिल्ह्यातील हवाईपूर भागात अशीच एक घटना घडली, जिथे वन विभागाच्या सतर्कतेमुळे आणि लोको पायलटच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला.

हवाईपूर भागातील रेल्वे ट्रॅकवरून हत्तींचा एक मोठा कळप हळूहळू ट्रॅक ओलांडत होता. याचवेळी तेथून ‘डाऊन राजधानी एक्स्प्रेस’ जाणार होती. सुदैवाने वन विभागाच्या टीमचे लक्ष वेळेत या हत्तींवर पडले. कर्मचाऱ्यांनी अजिबात वेळ न घालवता रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि ट्रेन थांबवण्याची तयारी सुरू केली. हत्तींना ट्रॅकवर पाहताच वन कर्मचाऱ्यांनी लोको पायलट आणि लुमडिंग रेल्वे कंट्रोल रूमला तातडीने माहिती दिली. रेल्वे प्रशासनानेही घटनेचे गांभीर्य ओळखून हवाईपूर येथे किलोमीटर १६७/८ जवळ राजधानी एक्स्प्रेस सुरक्षितपणे थांबवली.

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वन कर्मचारी घटनास्थळी हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वन कर्मचारी ट्रेनला थांबण्याचा इशारा करताना आणि हत्तींचा कळप हळूहळू ट्रॅक ओलांडताना दिसत आहे. या घटनेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ट्रेन पुढे नेण्याची कोणतीही घाई केली गेली नाही. वन विभाग आणि रेल्वेने आधी हत्तींना सुरक्षितपणे ट्रॅक ओलांडू दिला. हत्ती ट्रॅकवरून बाजूला झाल्यानंतर आणि परिसर सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच राजधानी एक्स्प्रेसला पुढे रवाना करण्यात आले.

वन कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. आसामचे वनमंत्री जयंत मल्ल बरुआ आणि मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. होजाई जिल्ह्यात हत्ती आणि ट्रेनच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. कारण याआधी डिसेंबर २०२५ मध्ये याच जिल्ह्यात राजधानी एक्स्प्रेस आणि हत्तींच्या कळपाची धडक होऊन तब्बल सात हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT