नैरोबीः लहान मुलं खोड्या, दंगामस्ती करतातच. जर मुलं खोडकर नसतील, तर ती मुलं कसली? मात्र आयांच्या नाकी नऊ आणणाऱ्या या मुलांना आवरणे हे त्यांच्या आईलाच जमते, हेही तितकेच खरे. हाका मारूनही घरी न येणाऱ्या वात्रट पोराला कानाला धरून घराकडे आणणारी आई कुठेही पाहायला मिळते. मात्र, जंगलात एखादी हत्तीण आपल्या पिल्लाबाबत असेच काहीसे करीत असेल याची आपण कल्पना करणार नाही. मात्र, आता असाच एक व्हिडीओ युगांडातून समोर आला आहे. त्यामध्ये आपल्या पिल्लाचा पाय चक्क सोंडेत पकडून त्याला उचलून घेऊन जात असताना ही हत्तीण दिसत आहे. आपल्या पिल्लावर एकाच वेळी प्रेम आणि राग व्यक्त करणाऱ्या या हत्तीणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा व्हिडीओ युगांडामधील ‘वाईल्डफ्रेंडस् आफ्रिका’ या सफारी कंपनीने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, एखाद्या हत्तिणीने आपल्या पिल्लाला अशा प्रकारे उचलून घेऊन जाणे ही अतिशय दुर्मीळ गोष्ट असून, ती सहसा पाहायला मिळत नाही. व्हिडीओच्या सुरुवातीला हत्तीचे छोटे पिल्लू इतर मोठ्या हत्तींच्या घोळक्यात उभे असल्याचे दिसते. ते पिल्लू प्रचंड मस्तीच्या मूडमध्ये होते. कधी इकडे तर कधी तिकडे धावत त्याचा खोडकरपणा सुरूच होता.
पिल्लाची ही मस्ती थांबायला तयार नसल्याचे पाहून अखेर आईने आपल्या सोंडेचा अचूक वापर केला. तिने पिल्लाचा एक पाय आपल्या सोंडेत घट्ट पकडला आणि त्याला हवेत लटकवत ती चालू लागली. सोंडेला लटकलेल्या अवस्थेत ते पिल्लू जणू आपल्या आईला ‘मला सोडून दे, मला अजून खेळायचे आहे’ असे सांगत असल्याचा भास होतो; पण आई मात्र त्याचे काहीच ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. मैदानावर खेळणाऱ्या लहान मुलांना त्यांची आई जशी हाताला किंवा कानाला धरून फरफटत घरी घेऊन जाते, अगदी तसाच हा नजारा होता. आई ही आईच असते, मग मनुष्य प्रजातीमधील असो किंवा हत्ती!