लंडन : सुमारे 480,000 वर्षांपूर्वी सध्या बिटनमध्ये राहणाऱ्या आद्य मानवांच्या वंशजांनी हत्तीच्या हाडापासून बनवलेले त्रिकोणी शस्त्र हातकुऱ्हाड धार लावण्यासाठी वापरली होती, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. हे शस्त्र सुमारे 4.3 बाय 2.3 इंच (10.9 बाय 5.8 सेंटिमीटर) आकाराचे असून, युरोपमध्ये आतापर्यंत सापडलेले सर्वात जुने हत्तीच्या हाडाचे साधन असल्याचे संशोधन सांगते. हे संशोधन सायन्स अडव्हान्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झाले.
या संशोधनातून उत्तर दिशेच्या हवामानात स्थायिक होत असताना आद्य मानवांच्या वंशजामध्ये असलेली उच्च पातळीची साधनसंपत्ती वापरण्याची क्षमता, जुळवून घेण्याची ताकद आणि कल्पकता स्पष्ट होते. पुराव्यानुसार पाषाणयुग (पॅलिओलिथिक काळ) भर आद्य मानव विविध उद्देशांसाठी हत्तीची हाडे आणि सुळे वापरत होते. मात्र, ‘इतक्या जुन्या किंवा त्याहून जुन्या काळातील हत्तीच्या हाडाचे साधन जगात कुठेही सापडणे अत्यंत दुर्मीळ आहे,’ असे या अभ्यासाच्या सहलेखिका आणि लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील पॅलिओअँथोपोलॉजिस्ट सिल्व्हिया बेलो यांनी सांगितले.
या ‘अनपेक्षित’ शोधामुळे जगातील सर्वात जुन्या हत्तीच्या हाडांच्या साधनांपैकी एक समोर आले असून, आद्य मानवांमध्ये प्रगत तांत्रिक विकास, नवीन कल्पनाशक्ती, साधनांचा कुशल वापर आणि कारागिरी असल्याचे अधोरेखित होते, असे संशोधकांनी अभ्यासात नमूद केले आहे. हे शस्त्र नेमके कोणत्या मानवसमूहाने वापरले याबाबत संशोधकांना खात्री नाही. मात्र, शस्त्राचा कालखंड आणि सापडलेले ठिकाण लक्षात घेता, प्रारंभीचे निअँडरथल्स किंवा होमो हायडेलबर्गेन्सिस हे दोन संभाव्य मानव असू शकतात. हे शस्त्र तयार करणाऱ्या आद्य मानव पूर्वजांच्या चातुर्याचे आणि बुद्धिमत्तेचे अद्भुत दर्शन घडवते, असे बेलो म्हणाल्या.