Electron catapult | प्रकाशाच्या वेगाच्या जवळ पोहोचणारा ‘इलेक्ट्रॉन कॅटापल्ट’ 
विश्वसंचार

Electron catapult | प्रकाशाच्या वेगाच्या जवळ पोहोचणारा ‘इलेक्ट्रॉन कॅटापल्ट’

पुढारी वृत्तसेवा

केंब्रिज : केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी सौरऊर्जेच्या संदर्भात एक अत्यंत विस्मयकारक शोध लावला आहे. सौर साहित्यामध्ये इलेक्ट्रॉन निसर्गातील कमाल वेगाच्या अगदी जवळ पोहोचू शकतात, असे या संशोधनातून समोर आले आहे. या शोधामुळे सौरऊर्जा णाली कार्य करण्याच्या जुन्या आणि प्रस्थापित सिद्धांतांना मोठे आव्हान मिळाले आहे.

प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांदरम्यान, शास्त्रज्ञांनी केवळ 18 फेम्टोसेकंद (एका सेकंदाच्या 20 क्वॉड्रिलियन भागापेक्षाही कमी वेळ) चालणार्‍या हालचालींचा मागोवा घेतला. एका साध्या रेणवीय कंपनादरम्यान विद्युत प्रभार वेगळा होत असल्याचे संशोधकांनी प्रत्यक्ष पाहिले. ‘आम्ही मुद्दाम अशी प्रणाली तयार केली होती, जी पारंपरिक सिद्धांतानुसार इतक्या वेगाने चार्ज ट्रान्स्फर करू शकणार नव्हती,’ असे सेंट जॉन्स कॉलेजचे रिसर्च फेलो आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक डॉ. प्रत्युष घोष यांनी सांगितले. ‘पारंपरिक डिझाईन नियमांनुसार ही प्रक्रिया संथ असायला हवी होती, म्हणूनच हे निकाल धक्कादायक आहेत.’

डॉ. घोष यांच्या मते, इलेक्ट्रॉन हे विनाकारण इकडे तिकडे फिरण्याऐवजी एका वेगवान झेपेत फेकले जातात. रेणूंचे कंपन एखाद्या ‘कॅटापल्ट’ किंवा ‘गोफणी’सारखे काम करते. हे कंपन केवळ या प्रक्रियेत सोबत नसते, तर ते या प्रक्रियेला सक्रियपणे चालना देते. 5 मार्च 2026 रोजी ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनाने सौरऊर्जा विज्ञानातील अनेक जुन्या समजांना धक्का दिला आहे. आतापर्यंत असे मानले जात होते की, वेगवान चार्ज ट्रान्स्फरसाठी साहित्यामध्ये मोठ्या ऊर्जेची तफावत आवश्यक असते. मात्र, अशा अटींमुळे व्होल्टेज मर्यादित राहून ऊर्जेचे नुकसान होते.

या नवीन शोधामुळे आता कमी ऊर्जेच्या नुकसानीसह अधिक कार्यक्षम सौर यंत्रणा बनवणे शक्य होणार आहे. जेव्हा प्रकाश सौर साहित्यावर पडतो, तेव्हा ‘एक्झिटॉन’ नावाचे ऊर्जेचे पाकीट तयार होते. हे पाकीट जितक्या लवकर मुक्त प्रभारामध्ये विभागले जाईल, तितकी कमी ऊर्जा वाया जाते. या शोधामुळे भविष्यात अधिक कार्यक्षम सौर सेल, फोटोडिटेक्टर्स आणि प्रकाशसंश्लेषण प्रणाली विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शास्त्रज्ञ आता अणूंच्या हालचालींच्या वेगावर इलेक्ट्रॉनचे स्थलांतर पाहू शकत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT