Electric Bike World Record Journey | इलेक्ट्रिक मोटारसायकलने केला सर्वात लांब बाईक प्रवासाचा विश्वविक्रम 
विश्वसंचार

Electric Bike World Record Journey | इलेक्ट्रिक मोटारसायकलने केला सर्वात लांब बाईक प्रवासाचा विश्वविक्रम

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकन कंपनी ‘झिरो मोटारसायकल्स’च्या ‘झिरो डीएस’ या इलेक्ट्रिक मोटारसायकलने एकाच चार्जमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ आपल्या नावावर केला आहे. बॅटरी पूर्ण चार्ज असताना या दुचाकीने तब्बल २७१.२३ मैल (४३६.५ किलोमीटर) अंतर पार केले. या ऐतिहासिक कामगिरीसह ही बाईक एकाच चार्जमध्ये जगातील सर्वाधिक अंतर कापणारी इलेक्ट्रिक मोटारसायकल ठरली आहे.

बेल्जियमचे रायडर जेले वेरस्टेन यांनी ‘झिरो डीएस’ ही इलेक्ट्रिक बाईक एकाच चार्जमध्ये फ्रान्स आणि इटली मार्गे भूमध्य सागरी किनारपट्टीपर्यंत चालवून दाखवली. झिरो डीएसने याआधीचा विक्रम मोडून ही नवी नोंद केली आहे. यापूर्वी हा विक्रम ‘व्हर्ज मोटारसायकल्स’च्या ‘टीएस प्रो’ या इलेक्ट्रिक बाईकच्या नावावर होता. त्या बाईकने एकाच चार्जमध्ये १९३.०५ मैल (३१०.६८ किलोमीटर) अंतर कापले होते. नव्या विक्रमातील अंतर जुन्या विक्रमापेक्षा १२५.८ किलोमीटरने जास्त असून, यात थेट ४० टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवली गेली आहे. हा विक्रम कोणत्याही बंदिस्त चाचणी ट्रॅकवर नव्हे, तर फ्रान्स आणि इटलीमधील डोंगर, गावे आणि सार्वजनिक रस्त्यांवर केला गेला.

मागील विक्रमाचा सरासरी वेग केवळ १२ मैल प्रतितास (सुमारे १९ कि.मी./तास) होता, तर Zero च्या या प्रवासात सरासरी ३२ मैल प्रतितास (सुमारे ५१ कि.मी./तास) इतका वेग राखण्यात आला. म्हणजेच हे अंतर कमी वेगात चालवून नव्हे, तर सामान्य ड्रायव्हिंग वेगात पार करण्यात आले. डोंगराळ भाग आणि उतारावर चालकाने ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केला, ज्यामुळे ब्रेक लावल्यावर बॅटरी आपोआप चार्ज होत राहिली. प्रवासादरम्यान बहुतांश वेळ हवामान फारसे खराब नव्हते; मात्र शेवटच्या ६० मैलांच्या (९७ किलोमीटर) प्रवासात चालकाला मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. विक्रमाची पारदर्शकता राखण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बाईकचे चार्जिंग पोर्ट पूर्णपणे सील करण्यात आले होते. तसेच, चालकाजवळ दोन GPS ट्रॅकर्स उपलब्ध होते. प्रवासाच्या शेवटी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌च्या प्रतिनिधींनी ट्रॅकिंग डेटाची पडताळणी करून या कामगिरीला अधिकृत दुजोरा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT