Electric Bicycle 
विश्वसंचार

Electric Bicycle : कार नव्हे तर ही आहे इलेक्ट्रिक सायकल

चार चाके आणि छप्पर असलेली इलेक्ट्रिक सायकल; एका चार्जवर धावणार 80 कि.मी.

पुढारी वृत्तसेवा

लंडन : वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी जगभरात नवनवीन प्रयोग होत आहेत. याच पार्श्वभूमीवर, कार आणि सायकलचे उत्तम मिश्रण असलेली ‌‘एलेसी‌’ ( Elecy) नावाची एक अनोखी इलेक्ट्रिक सायकल युरोपमध्ये विकसित करण्यात आली आहे. दिसायला एखाद्या छोट्या कारसारखी वाटणारी ही सायकल सध्या ऑटोमोबाईल विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे. सामान्य सायकलींना दोन चाके असतात; मात्र ‌‘एलेसी‌’ला चार चाके देण्यात आली आहेत. यामुळे सायकल चालवताना समतोल राखण्याची कसरत करावी लागत नाही. थांबल्यावर पाय खाली टेकवण्याचीही गरज पडत नाही, ज्यामुळे ती अत्यंत सुरक्षित आणि स्थिर मानली जाते.

ही सायकल वरून पूर्णपणे कव्हर केलेली आहे. यामुळे ऊन, पाऊस आणि थंडीपासून चालकाचे संरक्षण होते. वर्षाचे 365 दिवस कोणत्याही हवामानात याचा वापर करता येतो. यात कारप्रमाणे सरळ सीट दिली आहे. चालकासोबतच एक लहान मूल मागे आरामात बसू शकते. याचे छप्पर वरच्या बाजूला उघडत असल्याने आत बसणे आणि बाहेर पडणे अत्यंत सोपे आहे. सामान्य सायकलमध्ये सामान ठेवायला जागा नसते, पण ‌‘एलेसी‌’ मध्ये 300 लिटरची जागा दिली आहे. यात तुम्ही किराणा सामान किंवा बॅगा सहज ठेवू शकता. ही एक ‌‘इलेक्ट्रिक-असिस्ट‌’ सायकल आहे. म्हणजेच चालक जेव्हा पॅडल मारतो, तेव्हा मोटार त्याला वेग पकडण्यास मदत करते. एकदा फूल चार्ज केल्यावर ही सायकल 80 किलोमीटर पर्यंत धावू शकते. याची बॅटरी काढून घरात चार्ज करता येते. पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ 3 तास लागतात. युरोपीय नियमांनुसार, याची मोटार ताशी 25 किमी वेगापर्यंत मदत करते. या सायकलची निर्मिती करणाऱ्या तामारा इव्हानकोव्हा याच प्रोटोटाइप मॉडेलसह 23 देशांच्या प्रवासावर निघणार आहेत. सुमारे 30,000 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करून त्या या सायकलची क्षमता जगाला दाखवून देणार आहेत. इंधनाचे वाढते दर आणि पार्किंगची समस्या पाहता, शहरांमध्ये कमी अंतराच्या प्रवासासाठी ‌‘एलेसी‌’ हा कारला एक उत्तम आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो. ही सायकल केवळ पर्यावरणपूरकच नाही, तर खिशालाही परवडणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT