त्रिशूर : प्रेम करण्यासाठी किंवा ते शोधण्यासाठी कोणतेही वय नसते, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. केरळमधील एका सरकारी वृद्धाश्रमात राहणार्या एका ज्येष्ठ जोडप्याने हे वाक्य सत्यात उतरवून दाखवले आहे. वयाच्या सत्तरीनंतर एकमेकांच्या प्रेमात पडलेले 79 वर्षीय विजयराघवन आणि 75 वर्षीय सुलोचना यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली असून, त्यांच्या या अनोख्या विवाह सोहळ्याची कहाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे आणि देशभरातील लोकांची मने जिंकत आहे.
ही हृदयस्पर्शी कहाणी आहे केरळमधील एका सरकारी वृद्धाश्रमातील. विजयराघवन हे गेल्या काही वर्षांपासून या वृद्धाश्रमाचे रहिवासी आहेत, तर सुलोचना या काही महिन्यांपूर्वीच येथे दाखल झाल्या होत्या. वृद्धाश्रमाच्या एकाकी वातावरणात दोघांची ओळख झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले आणि या मैत्रीचे रूपांतर पुढे गाढ प्रेमात झाले. एकमेकांना भावनिक आधार देत, सुख-दुःख वाटून घेताना त्यांनी उर्वरित आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या या निर्णयाला वृद्धाश्रम प्रशासनाने आणि केरळच्या समाजकल्याण विभागानेही मनापासून पाठिंबा दिला. दोघांच्या इच्छेचा सन्मान करत, सोमवारी (7 जुलै) विशेष विवाह कायद्यांतर्गत त्यांच्या विवाहाचे आयोजन करण्यात आले. हा विवाहसोहळा केवळ औपचारिक नव्हता, तर तो अत्यंत आपुलकीने आणि थाटामाटात साजरा झाला.
या सोहळ्याला केरळच्या उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू, शहराचे महापौर एम. के. वर्गीस आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले. या विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच ते वार्याच्या वेगाने व्हायरल झाले. नेटकर्यांनी या नवदाम्पत्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका युझरने लिहिले, खर्या प्रेमाला वेळेचे किंवा वयाचे बंधन नसते. तर दुसर्या एकाने म्हटले, हे पाहून खूप आनंद झाला आणि मन भरून आले. प्रेमासाठी नेहमीच एक आशा असते. अशा हजारो सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.
समाजकल्याण विभागाच्या एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याची एकत्र राहण्याची तीव्र इच्छा पाहून विभागाने स्वतः पुढाकार घेऊन या विवाहाचे आयोजन केले. या विवाहसोहळ्याला साक्षीदार म्हणून उपस्थित असलेल्या मंत्री आर. बिंदू म्हणाल्या, या सुंदर आणि पवित्र क्षणाची साक्षीदार होताना मला विशेष आनंद आणि सन्मान वाटतो. हा सोहळा समाजासाठी एक प्रेरणा आहे.