वॉशिंग्टन : अमेरिकेतील 8 वर्षांची गायिका ऑरा व्ही हिने संगीतविश्वात नवा इतिहास रचला आहे. 68 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात तिने वडील फ्यूच यांच्यासोबत बेस्ट चिल्ड्रेन म्युझिक अल्बम या प्रतिष्ठित श्रेणीत ग्रॅमी जिंकत, वैयक्तिक श्रेणीत पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण कलाकार होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या ‘हार्मनी’ या अल्बमला हा सन्मान मिळाला.
या विजयामुळे ऑरा व्हीने ब्ल्यू आयव्ही कार्टरचा विक्रम मोडला आहे. प्रसिद्ध गायिका बेयॉन्से आणि रॅपर जे-झेड यांची मुलगी ब्ल्यू आयव्हीने 2021 मध्ये ‘ब्राऊन स्किन गर्ल’ या गाण्यासाठी अवघ्या 9 व्या वर्षी ग्रॅमी जिंकला होता. ऑरा केवळ 8 वर्षांची असताना हा टप्पा गाठत संगीत इतिहासात आपले नाव कोरले आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर फ्यूच यांनी कार्टर कुटुंबाचा आदरपूर्वक उल्लेख करत म्हटले, ‘बेयॉन्से, जे-झेड आणि ब्ल्यू आयव्ही यांना सलाम; पण आता हा विक्रम आम्हीच गाठणार होतो.’ त्यांच्या या वक्तव्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. ‘हार्मनी’ हा अल्बम ऑरा व्ही आणि तिच्या वडिलांमधील सुंदर नात्याचे प्रतीक आहे. हिप-हॉप, पॉप संगीत आणि आयुष्याला दिशा देणारे संदेश यांचे सुरेख मिश्रण या अल्बममध्ये पाहायला मिळते. ‘आय ॲम लव्ह’, ‘आय ॲम लाईट’ आणि ‘माय डॅडी’ यासारखी गाणी आत्मविश्वास, प्रेम आणि कुटुंबातील नात्यांचे महत्त्व अधोरेखित करतात. लहान वयात मिळालेला हा यशस्वी टप्पा ऑरा व्हीसाठी केवळ सुरुवात मानली जात असून, पुढील काळात ती जागतिक संगीतविश्वात मोठी छाप पाडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.