वॉशिंग्टन : अंडी ही अत्यंत नाजूक वस्तू मानली जाते, जी किंचितसा धक्का लागला तरी फुटते. दुसरीकडे, सिमेंटचा वापर कोणत्याही बांधकामाला मजबुती देण्यासाठी केला जातो. मात्र, एका नवीन संशोधनाने या संकल्पनेला थेट आव्हान दिले आहे. संशोधकांनी अंड्यांच्या टरफलांची पावडर सिमेंट आणि खडीसोबत (बांधकामाच्या काँक्रीटमध्ये) वापरली. या प्रयोगादरम्यान ठरावीक प्रमाणात अंड्याची पावडर मिसळल्यानंतर काँक्रीटला नेहमीच्या सिमेंटपेक्षा अधिक मजबुती मिळाल्याचे दिसून आले.
तज्ज्ञांनी अंड्यांची टरफले वाळवून त्यांची बारीक पावडर तयार केली आणि त्याचा वापर काँक्रीट बनवण्यासाठी केला. या काँक्रीटच्या मिश्रणात सिमेंटचे प्रमाण कमी करून सुमारे १० टक्के सिमेंटच्या जागी अंड्यांच्या टरफलांची पावडर वापरण्यात आली. चाचणीअंती असे दिसून आले की, साध्या काँक्रीटच्या तुलनेत अंड्याची पावडर वापरलेल्या काँक्रीटमध्ये तडे जाण्यापूर्वी अधिक वजन सहन करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. अंड्याची टरफले ही प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेटपासून (CaCO3) बनलेली असतात, जे सिमेंट तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चुनखडीसारखेच (Limestone) असते. चुनखडी हा सिमेंट निर्मितीतील मुख्य कच्चा माल आहे.
त्यामुळे अंड्यांची पावडर काँक्रीटसाठी कोणतीही अनोळखी वस्तू नसून, ती सिमेंटच्या मूळ घटकाचाच एक जवळचा रासायनिक घटक आहे. कुक्कुटपालन उद्योगात अंड्यांची टरफले मोठ्या प्रमाणावर कचरा म्हणून फेकून दिली जातात. सिमेंटच्या जागी त्यांचा वापर केल्यास चुनखडीचे उत्खनन कमी होईल, ते भट्ट्यांमध्ये भाजण्याचे प्रमाण घटेल आणि कचऱ्याच्या समस्येवरही मात करता येईल. तज्ज्ञांच्या मते, यामुळे निसर्गातील चुनखडीची बचत तर होईलच, शिवाय अंड्यांच्या कचऱ्याचा योग्य पुनर्वापरही शक्य होईल. या अभ्यासातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काँक्रीटमध्ये अंड्यांच्या टरफलांच्या पावडरचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यास परिणाम उलटे होतात.
१० टक्क्यांहून अधिक वापर केल्यास काँक्रीटची मजबुती कमी झाल्याचे आढळले. पावडरचे प्रमाण जास्त झाल्यास मिश्रणात अतिसूक्ष्म छिद्रे तयार होतात आणि घटकांमधील पकड (Bonding) कमकुवत होते. तज्ज्ञांच्या मते, कार्बन उत्सर्जन आणि कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे. बांधकामात १० टक्के सिमेंटच्या ऐवजी फेकून दिलेल्या कचऱ्याचा वापर झाला, तर सिमेंट उद्योगामुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात मोठी घट होऊ शकते, जे पर्यावरणासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.