वॉशिंग्टन : जगाच्या नाकीनऊ आणणार्या अमेरिकेला आता चोरट्यांनी ‘नाक में दम’ करून सोडून आहे! ‘महासत्ता’ अमेरिका सध्या अंडी चोरणार्या चोरांमुळे बेजार झाली आहे. अमेरिकेत सध्या मोठ्या प्रमाणावर अंड्यांची चोरी होत आहे. पेन्सिल्वानियामध्ये हजारो डॉलरच्या किंमतीची लाखो अंडी चोरांनी पळवली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ही चोरी ग्रीन कॅसलमध्ये पीट अँड गेरी ऑर्गेनिक्स ‘एलएलसी’मध्ये झाली आहे. या अंड्यांची किंमत 40,000 डॉलर म्हणजे 34,91,425 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेत सध्या अंड्यांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे देशातील अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार, सध्या देशात रिटेलमध्ये अंड्याची किंमत सरासरी 7.08 डॉलर झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील ही सातपट वाढ आहे. न्यूयॉर्कमध्ये अंड्याच्या कार्टनची किंमत 11.99 डॉलरवर गेली आहे. त्यामुळेच अमेरिकेत अंड्याची चोरी होत आहे. पहिल्यांदाच अमेरिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंड्यांची चोरी झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. चोरांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंडी चोरली आणि कुणाला त्याची कानोकान खबरही लागली नाही! चोर आले आणि बिनधास्त अंडी घेऊन गेले. एवढा मोठा माल भरून नेला, तरीही त्यांना कोणीच अडवलं नाही, याचं पोलिसांनाही आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे पोलिस आता सीसीटीव्ही फुटेज बघून या चोरांचा तपास करत आहेत. अमेरिकेत सध्या अंड्यांचा पुरवठा कमी आणि किंमत अधिक अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळेच नागरिकांना अंडी खरेदी करण्यासाठी अधिकची किंमत मोजावी लागत आहे. काही लोक तर अंड्यांच्या किमती अजून वाढतील म्हणून अंड्यांचा स्टॉक करून ठेवत आहेत. किरकोळ दरात अंडी खरेदी करणार्या ग्राहकांना फक्त तीन कार्टनच विकत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक कार्टन घेण्याची त्यांना मुभा देण्यात आलेली नाही. अमेरिकेत अंड्यांची कमतरता होण्यामागचे कारण बर्ड फ्लू असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत ही समस्या निर्माण झाली आहे. बर्ड फ्लूमुळे लाखो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अंड्यांची संख्या कमी झाल्याने अंड्यांचे भाव वाढले आहेत. 2022 मध्ये बर्ड फ्लूमुळे 104 दशलक्ष अंडी देणार्या कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी एकट्या ऑक्टोबर महिन्यात 29 दशलक्ष कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. म्हणून अंड्यांची टंचाई निर्माण झाली होती.