NASA Swift Observatory | नासाची ‘स्विफ्ट’ वेधशाळा वाचवण्याची मोहीम अपयशी 
विश्वसंचार

NASA Swift Observatory | नासाची ‘स्विफ्ट’ वेधशाळा वाचवण्याची मोहीम अपयशी

‘लिंक’ उपग्रहाचे बचावकार्य रद्द

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’च्या ऐतिहासिक नील गेहरल्स स्विफ्ट वेधशाळेला वाचवण्यासाठी सुरू केलेली अत्यंत धाडसी मोहीम अखेर अपयशी ठरली आहे. स्विफ्टची कक्षा उंचावण्यासाठी पाठवलेला ‘लिंक’ उपग्रह आता ही बचाव मोहीम पूर्ण करू शकणार नाही, अशी अधिकृत माहिती ‘नासा’ आणि ‘कॅटॅलिस्ट स्पेस टेक्नॉलॉजीज’ने जाहीर केली आहे.

गेल्या २२ वर्षांपासून कार्यरत असलेली स्विफ्ट वेधशाळा सौर हालचाली आणि वातावरणातील घर्षणामुळे हळूहळू पृथ्वीच्या दिशेने खाली येत आहे. या वेधशाळेला सुरक्षित उंचीवर ढकलण्यासाठी ३ जुलै रोजी ‘लिंक’ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटी या उपग्रहावरील नियंत्रण सुटले आणि तो अनियंत्रितपणे फिरू लागला. कॅटॅलिस्ट कंपनीने उपग्रहावर पुन्हा नियंत्रण मिळवले असले, तरी सातत्याने उद्‌भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ही बचाव मोहीम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पृथ्वीच्या वातावरणात स्विफ्टचा अंत निश्चित

‘नासा’च्या माहितीनुसार, स्विफ्ट वेधशाळा या वर्षाच्या अखेरीस पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल आणि जळून नष्ट होईल. ‘नासा’चे प्रशासक जारेड इसाकमन यांनी सांगितले की, जेव्हा संभाव्य फायदा मोठा असतो, तेव्हा ‘नासा’ने वेगवान पावले उचलून जोखीम पत्करणे आवश्यक असते. हा निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे नसला, तरी घेतलेली जोखीम सार्थकी लागली आहे.

भविष्यातील मोहिमांसाठी प्रात्यक्षिक ठरणार

बचाव मोहीम रद्द झाली असली, तरी ‘लिंक’ची अंतराळातील सफर संपलेली नाही. आता हा उपग्रह स्विफ्ट वेधशाळेच्या जवळ जाऊन केवळ तांत्रिक प्रात्यक्षिक सादर करेल. या प्रयोगातून मिळणारा डेटा आणि अनुभव भविष्यातील अंतराळ मोहिमा तसेच सॅटेलाईट सर्व्हिसिंगसाठी अत्यंत दिशादर्शक ठरेल, असा विश्वास कॅटॅलिस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी घोनही ली यांनी व्यक्त केला आहे. स्विफ्टच्या निवृत्तीनंतर नासा आपल्या इतर कार्यरत वेधशाळांच्या मदतीने अवकाशातील घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT