विश्वसंचार

रेड मीटमुळे होते ‘हे’ नुकसान

Arun Patil

नवी दिल्ली : आरोग्यासाठी पोषक आणि संतुलित आहार गरजेचा आहे. आरोग्य उत्तम राहावे आणि शरीराला सर्व पोषक घटक मिळावेत यासाठी बहुतांश लोक शाकाहारासोबत मांसाहारदेखील करतात. अंडी, चिकन, मासे आणि मटन आदी पदार्थांच्या सेवनातून शरीराला विविध पोषक घटक मिळतात. मांस प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत मानला जातो. मात्र, काही वैद्यकीय तज्ज्ञ रेड मीट म्हणजेच लाल मांस व प्रक्रियायुक्त मांस कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. रेड मीट जास्त प्रमाणात खाणे शरीरासाठी नुकसानदायी ठरू शकते. लाल मांस जास्त खाल्ल्यास कोलेस्टेरॉलची पातळी वाढून हृदयविकार होऊ शकतो तसेच हाडांचे आजार होऊ शकतात.

रेड मीट म्हणजे लाल रंगाचे मांस आणि व्हाईट मीट म्हणजे चिकन किंवा मासे अशा प्राण्यांचे मांस. रेड मीटचे काही लाभही असतात; पण त्यांचे अतिसेवन धोकादायक ठरू शकते. काही प्रकारच्या मांसात सॅच्युरेटेड फॅटस् मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने कोरोनरी हार्ट डिसिजचा धोका वाढतो. प्राणीज प्रथिने, विशेषतः लाल मांस हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असले तरी ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास नुकसानदायी ठरू शकते. जास्त प्रमाणात प्रोटिन असलेले पदार्थ विशेषतः प्राणीज पदार्थ आहारात समाविष्ट केले तर शरीरातील कॅल्शियम कमी होऊन हाडांचे आरोग्य बिघडू शकते.

प्राणीज प्रथिने विशेषतः लाल मांस खाल्ल्याने रक्त अम्लीय बनू शकते. त्यामुळे हाडांमधले कॅल्शियम बाहेर टाकले जाऊ शकते. मांसामध्ये उच्च फॉस्फरस ते कॅल्शियम असे गुणोत्तर असते. त्यामुळे कॅल्शियम बाहेर टाकण्याचे प्रमाण वाढते. परिणामी, हाडांतील कॅल्शियम कमी होऊन ती ठिसूळ होऊ शकतात. बीन्स, मसूर, भाज्या आणि पौष्टिक धान्य हे मांसविरहित पदार्थ आहारात गरजेचे आहेत. वनस्पती आधारित प्रोटिनयुक्त पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पालेभाज्या, वनस्पती आधारित प्रोटिनयुक्त पदार्थ हे मांसाच्या तुलनेत स्वस्तही आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT