Spicy Food Benefits 
विश्वसंचार

Spicy Food Benefits : दररोज तिखट खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका १४ टक्क्यांनी कमी, जाणून घ्या काय आहे यामागचं तथ्य?

जाणून घ्या मिरची सेवनाचे आरोग्यदायी फायदे

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : बहुतांश भारतीयांना तिखट आणि मसालेदार अन्न मनापासून आवडते. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि त्याला तिखटपणा आणण्यासाठी विविध मसाल्यांचा व मिरच्यांचा वापर केला जातो. मात्र, तुम्हाला माहित आहे का, की रोजच्या आहारात मिरची किंवा तिखट पदार्थांचा समावेश केल्याने तुमचे आयुष्य वाढू शकते? गेल्या काही वर्षांत झालेल्या विविध संशोधनांमध्ये मसालेदार अन्न आणि दीर्घायुष्य यांच्यात एक सकारात्मक संबंध दिसून आला आहे.

एका व्यापक अभ्यासादरम्यान तब्बल ५ लाखांहून अधिक लोकांच्या आरोग्याचे आणि आहाराचे निरीक्षण करण्यात आले. या अभ्यासात पुढील निष्कर्ष समोर आले : आठवड्यातून ६ ते ७ दिवस मसालेदार/तिखट अन्न खाणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका, आठवड्यातून एकदा किंवा त्याहून कमी तिखट खाणाऱ्यांच्या तुलनेत १४ टक्क्यांनी कमी आढळला. नियमित तिखट खाणाऱ्यांमध्ये कर्करोग, हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या गंभीर आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी दिसून आले. आणखी एका संशोधनानुसार, आहारात नियमित लाल मिरचीचा वापर करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका १३ टक्क्यांनी कमी असतो. मिरचीच्या तिखटपणाचे मुख्य कारण म्हणजे त्यात असणारा ‘कॅप्सॅसिन’ हा महत्त्वाचा घटक. हा घटक शरीरातील विशिष्ट रिसेप्टर्सवर काम करतो, ज्यामुळे आपल्याला तिखटपणा आणि उष्णता जाणवते. हाच घटक आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो.

संशोधनानुसार, कॅप्सॅसिन शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची म्हणजेच HDL ची पातळी वाढवण्यास मदत करते. तसेच, अन्नात तिखटपणा जास्त असल्यास अनेक लोक मिठाचा वापर कमी करतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. सामान्यतः तिखट खाल्ल्याने पोटाला त्रास होतो असा समज आहे. मात्र, संशोधनानुसार कॅप्सॅसिन हे पोटासाठी थेट हानिकारक नसते. तरीही ज्यांना आधीपासूनच ॲसिडिटी, गॅस किंवा पचनाच्या समस्या आहेत, त्यांनी तिखट खाताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT