नवी दिल्ली : पावसाळा सुरू झाला आहे. या ऋतूमध्ये आपल्या खाण्यापिण्याची आणि जीवनशैलीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थोडासा निष्काळजीपणा आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, या ऋतूमध्ये अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही मक्याच्या कणसाचे सेवन करू शकता, असे आहारतज्ज्ञ सांगतात. पावसाळ्याच्या ओलसर वातावरणात खमंग भाजलेले किंवा उकडलेले कणीस खाण्याचा आनंद अनेक लोक घेत असतात, पण ते केवळ स्वादासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही गुणकारी आहे!
कणसामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटस् असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. कणसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. तसेच कणसामध्ये असलेले जीवनसत्त्वे नवीन पेशी तयार करतात. याशिवाय, ते मधुमेहावरही नियंत्रण ठेवते. या ऋतूत बहुतेक लोकांना सुस्ती जाणवते. अशा परिस्थितीत कणीस एनर्जी बूस्टर म्हणून काम करते. त्यात असलेले नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेटस् तुम्हाला त्वरित ऊर्जा देतात.
जर तुम्हाला वजन लवकर कमी करायचे असेल तर तुम्ही कणीस खावे, असे तज्ज्ञ सांगतात. खरं तर, त्यात असलेले फायबर पोट बराच काळ भरलेले ठेवते. यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळता. ते कॅलरीजदेखील जलद बर्न करते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते. या काळात अनेक प्रकारच्या हंगामी आजारांचा धोका वाढतो. यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही मका खाल्ला तर ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेलच, पण आजारांचा धोकाही कमी होतो. मक्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटस् रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.