Heart Disease Prevention | रोज एक आंबा आणि अ‍ॅव्होकॅडो खा; हृदयाला होऊ शकतो फायदा! 
विश्वसंचार

Heart Disease Prevention | रोज एक आंबा आणि अ‍ॅव्होकॅडो खा; हृदयाला होऊ शकतो फायदा!

मधुमेहपूर्व स्थिती असलेल्या प्रौढांवरील अभ्यासातून निष्कर्ष

पुढारी वृत्तसेवा

न्‍यूयॉर्क : आंबा आणि अ‍ॅव्होकॅडो ही दोन फळे रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास हृदयाच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. मधुमेहपूर्व स्थिती (प्री-डायबेटिस) असलेल्या प्रौढ व्यक्तींवर करण्यात आलेल्या आठ आठवड्यांच्या अभ्यासात या फळांचे नियमित सेवन करणाऱ्यांच्या रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता सुधारल्याचे आढळले. विशेषतः, पुरुषांमध्ये रक्तदाबातही सकारात्मक बदल दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे, या बदलांसाठी सहभागींचे वजन किंवा एकूण कॅलरी सेवन वाढले नाही.

अमेरिकेतील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. त्यात २५ ते ६० वयोगटातील ८२ प्रौढ व्यक्तींचा समावेश होता. या सर्वांना मधुमेहपूर्व स्थिती होती आणि त्यांचे वजन जास्त किंवा लठ्ठपणाच्या श्रेणीत होते. एका गटाला दररोज एक मध्यम आकाराचा हॅस अ‍ॅव्होकॅडो आणि एक कप ताजा आंबा देण्यात आला. दुसऱ्या गटाला त्याच कॅलरीचे कार्बोहायड्रेटयुक्त पर्यायी पदार्थ देण्यात आले.

रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा

रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह वाढल्यावर त्या किती प्रभावीपणे प्रसरण पावतात, हे तपासण्यासाठी ‘फ्लो-मेडिएटेड डायलेशन’ (एफएमडी) ही चाचणी करण्यात आली. आंबा आणि अ‍ॅव्होकॅडो खाणाऱ्या गटात हे मोजमाप ६.७ टक्क्यांपर्यंत वाढले. तुलनेत दुसऱ्या गटात ते ४.६ टक्क्यांपर्यंत घसरले. यावरून या फळांच्या सेवनामुळे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत होऊ शकते, असे संशोधकांनी नमूद केले. या संशोधनात रक्तदाबाच्या बाबतीतही पुरुषांमध्ये फरक दिसला. नियंत्रण गटातील पुरुषांचा मध्यवर्ती रक्तदाब सरासरी ५ मि.मी. पाऱ्याने वाढला; तर आंबा आणि अ‍ॅव्होकॅडो खाणाऱ्या गटात तो सुमारे १.९ मि.मी. पाऱ्याने कमी झाला.

पोषक घटकांचा फायदा

आंब्यामध्ये फायबर आणि ‘व्हिटॅमिन सी’ मुबलक असते. व्हिटॅमिन सी पेशींचे नुकसान रोखण्यास मदत करणारे अँटिऑक्सिडंट आहे. अ‍ॅव्होकॅडोमध्ये फायबर, असंतृप्त चरबी आणि पोटॅशियम असते. असंतृप्त चरबी कमी आरोग्यदायी चरबीच्या जागी घेतल्यास खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होऊ शकते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते. अभ्यासात काही मूत्रपिंडविषयक निर्देशांकांतही सुधारणा दिसली. मात्र, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर आणि दाहाशी संबंधित घटकांमध्ये लक्षणीय बदल आढळला नाही. हा अभ्यास जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित झाला आहे. मात्र, अभ्यासाचा कालावधी केवळ आठ आठवडे आणि सहभागींची संख्या मर्यादित असल्याने हे परिणाम दीर्घकाळ टिकतात का, हे स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT