नैरोबी : गेल्या 5,000 वर्षांत पूर्व आफ्रिकेतील हवामान कमालीचे कोरडे झाले आहे. मात्र, आता एका नवीन संशोधनातून असा निष्कर्ष समोर आला आहे की, हवामानातील या बदलामुळे आफ्रिका खंड दुभंगण्याची प्रक्रिया अधिक वेगवान झाली असावी. नोव्हेंबरमध्ये ‘सायंटिफिक रिपोर्टस्’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, पूर्व आफ्रिकेतील मोठ्या तलावांच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे तिथल्या ‘फॉल्टस्’ (भूगर्भातील भेगा) सरकण्याचा वेग वाढला आहे.
कोलंबिया विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ प्रोफेसर ख्रिस्तोफर शोल्झ यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. शोल्झ यांच्या मते, ‘साधारणपणे आपण असा विचार करतो की, पर्वतांच्या निर्मितीमुळे स्थानिक हवामान बदलते; पण हा प्रवास उलट दिशेनेही असू शकतो. म्हणजेच हवामानातील बदल पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींवर (प्लेट टेक्टॉनिक्स) प्रभाव टाकू शकतात.’ संशोधकांनी केनियामधील ‘लेक तुर्काना’ येथे अभ्यास केला. सुमारे 5,000 ते 9,000 वर्षांपूर्वी आफ्रिकेत अतिवृष्टीचा काळ होता. तेव्हा या तलावाची पातळी आजच्या तुलनेत चक्क 150 मीटरने अधिक खोल होती.
तलावाच्या तळाशी असलेल्या गाळाचा अभ्यास करताना संशोधकांना प्राचीन भूकंपांचे पुरावे आणि लहान भेगा आढळल्या. आफ्रिकेच्या खाली असलेला टेक्टोनिक प्लेट पूर्व आफ्रिकेतून खेचली जात आहे. यामुळे भविष्यात या खंडाचे दोन तुकडे होऊन तिथे नवीन समुद्र तयार होण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे हिमनद्या वितळल्यामुळे जमिनीवरील वजन हलके होते आणि जमीन वर उचलली जाते, तसेच काहीसे इथे घडत आहे. तलावांमधील पाण्याचे प्रचंड वजन कमी झाल्यामुळे भूगर्भातील थरांवरील दाब कमी झाला असून, त्यामुळे भूकंपासारख्या प्रक्रिया आणि प्लेटस् सरकण्याचा वेग वाढला आहे. संशोधनात असे आढळले की, आफ्रिकेतील ओला कालखंड संपल्यानंतर लेक तुर्काना भागातील भेगा सरकण्याचा वेग वर्षाला सरासरी 0.17 मिलिमीटरने वाढला आहे. सध्या संपूर्ण आफ्रिका खंड दरवर्षी साधारण 6.35 मिलिमीटर वेगाने दुभंगत आहे.