वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांत भूकंपाच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशातच भूकंपाबाबत एक संशोधन करण्यात आले, ज्यात खळबळजनक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत असे मानले जात होते की, भूकंपाच्या सिग्नलने स्फोट लपवता येत नाहीत; पण नवीन अभ्यासाने ते चुकीचे सिद्ध केले आहे. शास्त्रज्ञांनी पी-लहरी आणि एस-लहरींच्या गुणोत्तराने ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
लॉस अलामोस राष्ट्रीय प्रयोगशाळेच्या भूकंपशास्त्रज्ञांनी हे संशोधन केले असून हे संशोधन बुलेटिन ऑफ द सिस्मॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकामध्ये प्रकाशित झाले आहे. जोशुआ कार्मिकल यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आले. जोशुआ आणि त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की, उत्तर कोरियाने गेल्या 20 वर्षांत सहा अणुचाचण्या केल्या आहेत. तिथं भूकंपमापक उपकरणांची संख्या वाढल्याने असे दिसून आले आहे की, चाचणी स्थळांभोवती कमी तीव—तेचे भूकंप अधिक वारंवार होतात. यामुळे भूकंपाच्या धक्क्यांमध्ये स्फोटाची चिन्हे ओळखणे खूप कठीण होते. शास्त्रज्ञांचं म्हणणे आहे की, काही भूकंप हे प्रत्यक्षात गुप्त अणुचाचण्या असू शकतात. संशोधनात असं म्हटलं आहे की, भूकंपांमुळे होणारी हालचाल आणि गुप्त अणुस्फोटांमध्ये फरक करणं खूप कठीण आहे.
संशोधन पथकाला असं आढळून आले की, एका विशेष तंत्रामुळे 1.7 टन वजनाचा गाडलेला स्फोट 97 टक्के अचूकतेने शोधता येतो. तथापि, स्फोटाचे धक्के 100 सेकंदांच्या आत आणि 250 किलोमीटरच्या त्रिज्येत होणार्या भूकंपाशी जुळले, तर हे तंत्र केवळ 37 टक्के वेळेत अचूक परिणाम देते. म्हणजेच, अशा प्रकरणांमध्ये हे तंत्र काही प्रमाणात अपयशी ठरते.
जोशुआ म्हणतात की, भूकंप आणि अणुचाचणी धक्के यांच्या संयोजनामुळे त्यांना वेगळे करणे कठीण होते. आधुनिक तंत्रज्ञानदेखील यामध्ये अपयशी ठरते. स्फोट आणि भूकंपाचे हादरे यांचं संयोजन आपल्या सर्वोत्तम डिजिटल सिग्नल डिटेक्टरनाही स्फोट ओळखण्यास चकवू शकते. यामागील कारण म्हणजे, दोन्ही धक्के सारखेच आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की, भूकंपाचे धक्के स्फोटाच्या खुणा लपवू शकतात. ज्या भागात भूकंप वारंवार होतात, तिथे स्फोट ओळखणे खूप कठीण होईल.