मनिला : एक भूकंप नेमकं काय करू शकतो, किती हानी करू शकतो, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजवर घडलेल्या असंख्य घटनांमधून मिळाली आहेत. अशाच एका भूकंपानं नुकतंच असं रूप दाखवलं आहे, ज्यामुळं चक्क जगाच्या नकाशातच काही बदल झाले आहेत. ८ जून २०२६ ला फिलिपिन्सच्या मिंडानावो इथं सारंगानी बेटाच्या दक्षिणेकडे समुद्रात आलेल्या ७.८ तीव्रतेच्या भूकंपानं पृथ्वीलाही मोठा हादरा दिला. हा भूकंप इतका अधिक तीव्रतेचा होता की, त्यानंतर सारंगानी आणि नजीकच्या भागांमधून अतिशय हादरवणारं चित्र समोर आलं, जिथं चक्क अथांग समुद्र मागे हटल्याचं पाहायला मिळालं. समुद्राच्या पाण्यानं कैक वर्षे दडवून ठेवलेला भूभाग या भूकंपामुळं कोरड्याठाक जमिनीच्या रूपानं समोर आला. शास्त्रीय भाषेत समजून घ्यायचं झाल्यास या प्रक्रियेला ‘कोस्टल अपलिफ्ट’ असं म्हणतात.
या प्रक्रियेमध्ये समुद्रकिनारा आणखी मागे गेल्यानं या घटनेचा थेट परिणाम तिथं राहणाऱ्या स्थानिकांपुढं अनेक प्रश्न उपस्थित करून गेला आहे. समुद्राचं पाणी इतकं मागे जाण्याचं मुख्य कारण म्हणजे ते त्सुनामीच्या रूपात परत येईल का? अशी भीतीसुद्धा नागरिकांना सतावत आहे. संशोधकांनी मात्र याबाबत कोणत्याही वृत्ताला दुजोरा दिला नसून, पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेटमध्ये होणाऱ्या हालचालींचाच हा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे. पृथ्वीचं सर्वात वरील आवरण किंवा सर्वोच्च थर हा एकसंध तुकडा नसून, अनेक लहान-मोठे तुकडे एकत्र येऊन हा थर तयार झाला आहे. ज्याला ‘टेक्टोनिट प्लेट’ असं म्हणतात. शास्त्रीय सिद्धांतांनुसार या थरामध्ये अनेक भेगा असतात, ज्यांना ‘फॉल्ट’ असंही म्हटलं जातं. ज्यावेळी हे खंड एकमेकांविरुद्ध दिशेला सरकतात तेव्हा तीन फॉल्ट तयार होतात.
यामध्ये पहिला प्रकार असतो ‘स्ट्राईक-स्लिप फॉल्ट’. जिथं हॉरिझाँटल स्वरूपात अर्थात एखाद्या आडव्या रेषेप्रमाणं त्या एकमेकांमधील घर्षणातून वेगळ्या होतात. दुसरा प्रकार असतो ‘नॉर्मल फॉल्ट’, ज्यामध्ये एखाद्या तिरप्या भेगेवरील उंचवट्याचा भाग खाली सरकतो. सारंगनीमध्ये आलेला भूकंप मात्र तिसऱ्या आणि सर्वात घातक प्रकारामध्ये मोडतो. ज्याला ‘थ्रस्ट फॉल्ट’ किंवा ‘रिव्हर्स फॉल्ट’ म्हणतात. यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि घर्षणाची क्रिया घडते. जेव्हा दोन टेक्टॉनिक प्लेट एकमेकांवर आदळतात तेव्हा एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या वर जाऊन थ्रस्ट अर्थात वर येते ज्यामुळं वरच्या भागात असणारी जमीन किंवा समुद्रतळ अचानक वर उठतो. फिलिपीन्स इन्स्टिट्यूट ऑफ वोल्केनोलॉजी एंड सीस्मोलॉजीच्या अहवालानुसार ८ जून २०२६ रोजी सारंगानी इथं आलेला भूकंपसुद्धा अशाच सबडक्शन सिस्टीमच्या हालचालीमुळं निर्माण झाला होता.