वॉशिंग्टन : पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात लहान दिवसाचे साक्षीदार आपण लवकरच ठरू शकतो. खगोल भौतिकशास्त्रज्ञांच्या एका नव्या संशोधनानुसार, गेल्या काही वर्षांपासून पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीत वाढ झाली आहे. 2020 पासून पृथ्वी आपल्या अक्षावर नेहमीपेक्षा जास्त वेगाने फिरत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत 24 तासांपेक्षाही लहान दिवस अनुभवता येऊ शकतो. हा दिवस या जुलै महिन्यात किंवा ऑगस्टमध्ये असू शकतो.
खगोल भौतिकशास्त्रज्ञ ग्रॅहम जोन्स यांच्या मते, यावर्षी 9 जुलै, 22 जुलै किंवा पुढील महिन्यात 5 ऑगस्ट रोजी इतिहासातील सर्वात लहान दिवस नोंदवला जाण्याची शक्यता आहे. या दिवशी दिवस सामान्य 24 तासांपेक्षा 1.66 मिलिसेकंद लहान असेल. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्राची कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्तापासून सर्वाधिक दूर गेल्याने पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर हा परिणाम होत आहे.
दिवस छोटा का होत आहे? एका सौर दिवसाचा कालावधी 86,400 सेकंद म्हणजेच अचूक 24 तास असतो. मात्र, पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कधीही पूर्णपणे स्थिर नसतो. 2020 मध्ये एका अज्ञात कारणामुळे पृथ्वीचा वेग वाढला आणि दिवसाचा कालावधी कमी होऊ लागला. 5 जुलै 2024 रोजी एक दिवस सामान्य दिवसापेक्षा 1.66 मिलिसेकंदांनी कमी असल्याचे नोंदवले गेले, जो एक विक्रम होता. विशेष म्हणजे, अब्जावधी वर्षांपासून चंद्र पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कमी करत आला आहे.
सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरील एक दिवस फक्त तीन ते सहा तासांचा असू शकत होता. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळेच आज दिवसाचा कालावधी 24 तासांपर्यंत पोहोचला आहे. चिंतेचे कारण आहे का? दिवस काही मिलिसेकंदांनी कमी झाल्याने सामान्य जनजीवनावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, अचूक वेळेवर अवलंबून असलेल्या उपग्रह, दूरसंचार आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात हे बदल महत्त्वाचे ठरतात.