विश्वसंचार

मंगळावर पृथ्वीसारखाच वादळाचा आवाज

Arun Patil

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या शेजारचा मंगळ ग्रह नेहमीच माणसाच्या अभ्यासाचा तसेच कुतूहलाचाही विषय बनून राहिलेला आहे. पृथ्वीवर हवा किंवा एखादे वादळ ही अगदीच सामान्य गोष्ट ठरते. पण पृथ्वीच्या बाहेर अशी काही घटना झाली तर त्याबाबत मोठी चर्चा झाली नाही तरच नवल म्हणावे लागले. पृथ्वीनंतर अन्य कोणत्या ग्रहावर राहता येईल यासाठीचा सर्वात जवळचा ग्रह म्हणजे मंगळ होय. गेल्या काही वर्षांत विविध अंतराळ संशोधन संस्थांनी मंगळाचा अभ्यास सुरू केला आहे.

यात अमेरिकेची अंतराळ संस्था नासा ही सर्वात आघाडीवर आहे. नासाने तेथील वादळाविषयीही बरीच माहिती मिळवली आहे. तेथील वादळाचा आवाज पृथ्वीवरील वादळासारखाच असतो हे स्पष्ट झालेले आहे. मंगळ ग्रहावरदेखील वादळे तयार होतात, हे याआधीच्या संशोधनात समोर आले होते. आता नासाला या वादळाचा आणि हवेचा आवाज कसा असतो हे कळाले आहे. नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने या लाल ग्रहावरील एका वादळाचा आवाज रेकॉर्ड केला आहे. धुळीचे हे छोटे वादळ रोव्हरवरून गेले. जेव्हापासून हे रोव्हर मंगळावर आहे, तेव्हापासून प्रथमच अशा प्रकारचा एखादा आवाज रेकॉर्ड करण्यात आला आहे.

रोव्हरने 10 सेकंदाचा धुळीच्या कणांचा आवाज रेकॉर्ड करून तो पृथ्वीवर पाठवला. नासाने दिलेल्या माहितीनुसार मंगळावर रेकॉर्ड करण्यात आलेल्या धुळीच्या वादळाचा आवाज पृथ्वीवर जसा असतो तसाच आहे. अर्थात मंगळावर वातावरण शांत असल्याने आवाज हलका येतो. नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात लेखक नाओमी मर्डोक लिहितात, हे धुळीचे वादळ रोव्हरवरून वेगाने गेले होते. तेव्हा रोव्हरमधील कॅमेर्‍याने त्याचे फोटो काढले आणि अन्य डेटा गोळा केला.

नासाकडून मंगळ ग्रहाचे फोटो अनेक वर्षांपासून काढले जात आहेत. पण या ग्रहावर आजवर कधीच कोणताही आवाज ऐकू आला नाही. लाल ग्रहावर अशा प्रकारचे चक्रीवादळ हे सामान्य गोष्ट आहे. ज्या वादळाचा आवाज रेकॉर्ड झाला आहे, तो किमान 400 फूट लांब आणि 80 फूट उंच होता. त्याचा वेग 16 फूट प्रति सेकंद इतका होता. या वादळाचा आवाज रेकॉर्ड करणे ही एक नशिबाची गोष्ट आहे. आम्हाला माहिती नाही की, भविष्यात पुन्हा असे कधी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT