Earth-Like Planet | ४९ प्रकाशवर्षे अंतरावर आढळला पृथ्वीसारखा वातावरण आणि पाण्याचा ग्रह! 
विश्वसंचार

Earth-Like Planet | ४९ प्रकाशवर्षे अंतरावर आढळला पृथ्वीसारखा वातावरण आणि पाण्याचा ग्रह!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आपल्या सौरमालेच्या बाहेर म्हणजेच परग्रहावर जीवनसृष्टी शोधण्याच्या मोहिमेला आता एक नवे आणि अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. संशोधकांनी पृथ्वीपासून ४९ प्रकाशवर्षे दूर असलेल्या आणि हुबेहूब पृथ्वीसारख्या दिसणाऱ्या एका ग्रहाभोवती वातावरणाचा शोध लावला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या खडकाळ ग्रहाच्या पृष्ठभागावर द्रव स्वरूपात पाणी असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हा ग्रह आपल्या ताऱ्याच्या ‘हॅबिटेबल झोन'मध्ये (राहण्यायोग्य क्षेत्र) स्थित असून, येथे पृथ्वीप्रमाणेच सजीव सृष्टी असू शकते, असा अंदाज आहे.

यापूर्वी आपल्या सौरमालेबाहेर केवळ वायूंनी बनलेल्या महाकाय ग्रहांभोवतीच वातावरण आढळले होते. परंतु, एका खडकाळ ग्रहाभोवती वातावरण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संशोधनाचे मुख्य लेखक डॉक्टर कॉलिन चेरुबिम यांनी सांगितले की, आपल्या सौरमालेबाहेरील राहण्यायोग्य क्षेत्रात असलेल्या एखाद्या खडकाळ ग्रहावर प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे वातावरणाची खात्री पटण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. डॉक्टर कॉलिन चेरुबिम यांच्या मते, हा शोध खरोखरच थरारक आहे.

ते म्हणाले, ‘या शोधामुळे ‘LHS 1140b’ हा ग्रह आपल्या सौरमालेबाहेर ॲस्ट्रोबायोलॉजी (खगोल-जीवशास्त्र) आणि सजीव सृष्टीच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी जगातील सर्वात आशादायक प्रयोगशाळा बनला आहे.’ या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा ५.६ पटीने जास्त असून, त्याची त्रिज्या ७० टक्के मोठी आहे. डॉ. चेरुबिम यांनी सांगितले की, एकूण रचना आणि तापमान या बाबतीत हा ग्रह पृथ्वीसारखाच आहे. मात्र, काही बाबतीत तो वेगळा आहे. हा ग्रह ‘टायडली लॉक्ड’ (ज्याची एकच बाजू कायम ताऱ्याकडे असते) आहे, तिथे पृथ्वीपेक्षा खूप जास्त प्रमाणात पाणी असू शकते आणि त्याचे वातावरणही वेगळे आहे. २०१७ मध्ये शोधला गेलेला हा ग्रह पृथ्वीच्या तुलनेत जवळ असून, तो ‘सेटस्‌’ तारामंडळातील एका छोट्या ‘लाल बुटक्या ताऱ्याची’ प्रदक्षिणा घालतो. हा तारा आपल्या सूर्यापेक्षा लहान आणि कमी तेजस्वी आहे; परंतु तो आपली ऊर्जा आयनकारी किरणोत्सर्गाच्या स्वरूपात बाहेर टाकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT