Earth Hemispheric Symmetry Study | पृथ्वीच्या पूर्व आणि पश्चिम गोलार्धात ‘गुप्त सममिती’  
विश्वसंचार

Earth Hemispheric Symmetry Study | पृथ्वीच्या पूर्व आणि पश्चिम गोलार्धात ‘गुप्त सममिती’

दोन्ही बाजूंनी परावर्तित होतोय सारखाच सूर्यप्रकाश!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : पृथ्वीचा उत्तर आणि दक्षिण गोलार्ध अवकाशात सारख्याच प्रमाणात सूर्यप्रकाश परावर्तित करतो, ज्याला ‘अल्बेडो’ म्हटले जाते. गेल्या अर्धशतकापासून शास्त्रज्ञांना ही गोष्ट माहीत आहे. उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण जास्त आहे आणि दक्षिण गोलार्धात महासागरांचे प्रमाण अधिक आहे, तरीही दोन्ही गोलार्धांचा अल्बेडो अगदी सारखाच आहे. आता शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या या डेटामागे लपलेली आणखी एक आश्चर्यकारक 'सममिती' (Symmetry - सारखेपणा) सापडली आहे. 'नेचर' या नियतकालिकात ३ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, पृथ्वीचा पूर्व आणि पश्चिम भाग देखील अगदी सारख्याच प्रमाणात सूर्यप्रकाश परावर्तित करत असल्याचे समोर आले आहे.

संशोधकांना आढळले की, पृथ्वीला पूर्व आणि पश्चिम अशा दोन समान भागांत विभागणारी ही रेषा संपूर्ण ग्रहाला वेढणाऱ्या एका मोठ्या वर्तुळाच्या रूपात आहे. ही रेषा प्रामुख्याने दोन रेखांशांनी बनलेली आहे : २७ अंश पूर्व आणि १५३ अंश पश्चिम रेखांश. ही रेषा उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत पूर्व युरोप, तुर्की, मध्य आफ्रिका, नॉर्वे आणि अलास्कामधून जाते. संशोधकांनी आपल्या शोधनिबंधात लिहिले आहे की, ‘‘पृथ्वी गोल असल्यामुळे, तिचे दोन स्वतंत्र भाग करणे आणि त्यांच्याकडून समान प्रमाणात सूर्यप्रकाश परावर्तित होणे यात फारसे आश्चर्य नाही.

पण आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की, हा सारखेपणा अत्यंत अचूक आहे.’’ दोन्ही गोलार्धांमधून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशातील फरक प्रति चौरस मीटर केवळ ०.०१ वॅट इतका नगण्य असण्याची शक्यता नैसर्गिकरित्या ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. जर ही सममिती पृथ्वीच्या हवामानाचा एक मूलभूत हिस्सा असेल, तर या शोधामुळे शास्त्रज्ञांना भविष्यातील जागतिक तापमानवाढीचा अंदाज लावण्यासाठी जागतिक हवामान मॉडेल्स तपासण्यात आणि सुधारण्यात मोठी मदत होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT