लंडन : आपण ज्या ब्रह्मांडात राहतो, ते खरंच कसे आहे? या मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधताना खगोलशास्त्रज्ञांनी एक अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते, आपली पृथ्वी आणि आपली आकाशगंगा एका महाकाय वैश्विक पोकळीत तरंगत आहेत. महास्फोटाच्या (बिग बँग) प्रतिध्वनींचा अभ्यास करून काढलेला हा निष्कर्ष खरा ठरल्यास, विश्वरचनाशास्त्रातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक असलेल्या ‘हबल तणावा’चे (Hubble tension) कोडे सुटू शकते आणि आपल्याला ब्रह्मांडाचे खरे वय समजण्यास मदत होऊ शकते.
इंग्लंडमधील रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या या संशोधनानुसार, आपली आकाशगंगा सुमारे 200 कोटी प्रकाशवर्ष विस्ताराच्या अशा प्रदेशात आहे, जिथे पदार्थांची घनता विश्वाच्या सरासरी घनतेपेक्षा 20 टक्क्यांनी कमी आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, आपण विश्वाच्या एका मोठ्या ‘बुडबुड्यात’ किंवा रिकाम्या जागेत राहत आहोत. गेल्या काही वर्षांपासून खगोलशास्त्रज्ञ एका मोठ्या कोड्याने त्रस्त आहेत. विश्वाच्या विस्ताराचा दर, ज्याला ‘हबल स्थिरांक’ म्हटले जाते, तो मोजण्याच्या दोन प्रमुख पद्धती वेगवेगळी उत्तरे देत आहेत.
महास्फोटानंतरच्या प्रारंभीच्या विश्वाच्या अभ्यासानुसार हा दर सुमारे 67 (किमी/से/मेगापार्सेक) येतो, तर आपल्या जवळच्या तार्यांच्या आणि आकाशगंगांच्या निरीक्षणांवरून तो सुमारे 73 इतका जास्त येतो. ही वरकरणी छोटी वाटणारी तफावत विश्वरचनाशास्त्राच्या प्रमाणित मॉडेलला मोठे आव्हान देत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी डार्क एनर्जी आणि डार्क मॅटरसारख्या संकल्पनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या नवीन संशोधनाचे प्रमुख, डॉ. इंद्रनील बानिक यांच्या मते, या समस्येचे उत्तर वैश्विक नसून स्थानिक असू शकते.
जर आपली आकाशगंगा एका कमी घनतेच्या पोकळीत असेल, तर त्या पोकळीच्या बाहेरील जास्त घनतेचे पदार्थ गुरुत्वाकर्षणाने आतील पदार्थांना बाहेरच्या दिशेने खेचतील. यामुळे पोकळीच्या आतील भागाचा विस्तार बाहेरील विश्वाच्या तुलनेत अधिक वेगाने होईल. याचाच अर्थ, आपण जवळच्या विश्वाचा जो जास्त विस्तार दर (73) मोजत आहोत, तो या स्थानिक पोकळीमुळे निर्माण झालेला एक परिणाम असू शकतो, तर दूरच्या विश्वाचा कमी विस्तार दर (67) हा संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा विस्तार दर असू शकतो. थोडक्यात, हबल स्थिरांकामधील तफावत ही वैश्विक नसून, आपल्या ‘स्थानिक’ परिस्थितीमुळे निर्माण झालेला एक भ्रम असू शकतो, असे हा सिद्धांत सांगतो.