Ancient Human Behaviour | आदिमानव जेवढा क्रूर, तेवढाच होता कुटुंबवत्‍सल! 
विश्वसंचार

Ancient Human Behaviour | आदिमानव जेवढा क्रूर, तेवढाच होता कुटुंबवत्‍सल!

पुढारी वृत्तसेवा

लंडन; वृत्तसंस्था : इराकच्या कुर्दीस्तान प्रांतातील झाग्रोस पर्वतरांगांमध्ये वसलेल्या प्रसिद्ध ‘शनिदार’ गुहेत सापडलेल्या एका नियंडरथल मानवाच्या सांगाड्याने मानववंशशास्त्रात खळबळ उडवून दिली आहे. सुमारे ७५ हजार वर्षांपूर्वीच्या या अवशेषांनी आधुनिक मानव म्हणून उत्क्रांत होण्याच्या आधीच्या सर्वात जवळच्या टप्प्यातील म्हणजेच नियंडरथल प्रजातीमध्ये केवळ हिंस्र वृत्तीच नव्हती, तर एकमेकांविषयी वाटणारी काळजी आणि करुणेची भावनाही अस्तित्वात असल्याचे सिद्ध केले आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष ‘सायंटिफिक रिपोर्टस्’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत.

शनिदार गुहेत जमिनीखाली तब्बल २५ फूट खोल गाडलेल्या अवस्थेत एका चाळिशीतील व्यक्तीचा अंशतः सांगाडा सापडला आहे, ज्याला संशोधकांनी ‘शनिदार ए’ असे नाव दिले आहे. त्याच्या डाव्या खांद्याच्या हाडावर सुमारे १५ मिमी रुंदीचे एक गोलाकार छिद्र आढळले आहे.

संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या केंब्रिज विद्यापीठाच्या मानववंशशास्त्रज्ञ एमा पोमरॉय यांच्या मते, ही जखम दगडी पात्याच्या नव्हे, तर लाकडी भाल्याच्या जोरदार प्रहारामुळे झाली होती. हा भाला छातीच्या डाव्या बाजूने, स्नायू आणि बरगड्या भेदत फुफ्फुसातून आरपार घुसला आणि पाठीच्या खांद्याच्या हाडाला छिद्र पाडून गेला. शिकारी प्राण्यांना तत्काळ ठार मारण्यासाठी जसा छातीवर वर्मी घाव घातला जातो, तसाच हा प्राणघातक वार होता. केंब्रिजचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ ग्रॅहम बार्कर यांच्या मते, ही शिकार अपघातातील नसून आपापसातील किंवा दोन विरोधी गटांतील संघर्षातून झालेली हत्या असल्याचे स्पष्ट होते.

क्रौर्यानंतर उलगडलेली करुणेची बाजू

या सांगाड्यात केवळ हत्येचा पुरावा नाही, तर सहकार्याची एक भावनिक बाजूही दडलेली आहे. ‘शनिदार ए’ या व्यक्तीच्या दातांच्या अभ्यासावरून असे दिसून आले की, मृत्यूच्या किमान एक वर्ष आधी त्याच्या चेहऱ्यावर जबर प्रहार झाला होता. यामध्ये त्याचे समोरचे दात तुटले होते आणि काही जबड्यात विचित्र वळले होते. त्या काळात अशी दुखापत झाल्यानंतर अन्‍न चावणे किंवा पाणी पिणे अत्यंत वेदनादायी आणि कठीण होते. समूह सदस्यांनी त्याचे अन्‍न बारीक करून भरवले नसते किंवा त्याची शुश्रूषा केली नसती, तर तो वर्षभर जिवंत राहूच शकला नसता. यावरून सिद्ध होते की, या आदिमानवांच्या समूहात आजारी आणि जखमी साथीदारांची काळजी घेण्याची प्रवृत्ती विकसित झाली होती.

एमा पोमरॉय यांच्या शब्दांत सांगायचे तर, आजच्या मानवी समाजात हिंसा आणि करुणा हे दोन्ही पैलू जसे एकत्र नांदताना दिसतात, अगदी तसेच ते शनिदार ए च्या आयुष्यातही एकत्र पाहायला मिळतात. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजूंनी नियंडरथल मानव आपल्यासारखेच होते.

आदिम रूढींना छेद देणारा शोध

नियंडरथल मानवांचा इतिहास युरेशियामध्ये सुमारे ४ लाख वर्षांपूर्वीपासून ते ४० हजार वर्षांपूर्वीपर्यंत पसरलेला होता. आजवरच्या लोकप्रिय समजुतीनुसार त्यांना अत्यंत असंस्कृत, रानटी आणि भावनाशून्य 'गुहामानव' मानले जात असे. मात्र शनिदार गुहेतील अंत्यसंस्काराची जागा, एकाच ठिकाणी व्यवस्थित पुरलेले पाच सांगाडे आणि ही शुश्रूषा या जुन्या समजुतींना छेद देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT