Dubai Gold Road | दुबईत बनणार जगातील पहिला ‘सोन्याचा रस्ता’ 
विश्वसंचार

Dubai Gold Road | दुबईत बनणार जगातील पहिला ‘सोन्याचा रस्ता’

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : एकीकडे सोन्याच्या किमती नवनवे विक्रम प्रस्थापित करत असतानाच, दुबईने जगाला थक्क करणारी एक घोषणा केली आहे. ‘इन्फ्लुएंसर हॉटस्पॉट’ आणि आलिशान वास्तूंचे शहर असलेल्या दुबईत आता जगातील पहिला ‘सोन्याचा रस्ता’ तयार होणार आहे. ‘द गोल्ड डिस्ट्रिक्ट’ या मोठ्या प्रकल्पाचा हा एक भाग असणार आहे.

दुबईची ज्वेलरी इंडस्ट्री अधिक सक्षम करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या खास क्षेत्राचा विकास केला जात आहे. येथे सोने, दागिने, अत्तरे, सौंदर्य प्रसाधने आणि जीवनशैलीशी संबंधित 1000 हून अधिक किरकोळ दुकाने असतील. प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड ‘जॉयलुक्कास’ या ठिकाणी 24,000 स्क्वेअर फूटचे आपले सर्वात मोठे फ्लॅगशिप स्टोअर सुरू करणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि ग्राहकांसाठी येथे 6 हॉटेल्समध्ये 1,000 हून अधिक खोल्यांची सोय केली जाईल.

सोन्याचा अनोखा रस्ता दुबईतील प्रसिद्ध डेरा परिसरात विकसित केला जाणार आहे. ‘इथरा दुबई’ या प्रॉपर्टी डेव्हलपरने ‘दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट’च्या अधिकृत लाँचिंग वेळी ही घोषणा केली. या प्रकल्पात भारतातील आघाडीचे ज्वेलरी रिटेलर्सही सहभागी होणार आहेत. दुबई फेस्टिव्हल्स अँड रिटेल एस्टॅब्लिशमेंटचे सीईओ अहमद अल खाजा यांनी सांगितले की, ‘सोने हे दुबईच्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक ओळखीचे अविभाज्य भाग आहे.

या खास ठिकाणाद्वारे आम्ही केवळ आमच्या वारशाचा उत्सव साजरा करणार नाही, तर सर्जनशीलता आणि शाश्वत विकासाच्या नव्या युगाची सुरुवात करू.’ ‘दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यात आणि गुंतवणुकीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, ज्यामुळे राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी दुबई जगातील सर्वोत्तम शहर म्हणून ओळखले जाईल,’ असेही खाजा यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT