Monkeys Drought Behavior | भीषण दुष्काळामुळे माकडांनी पोटच्या पिल्लांना सोडले वाऱ्यावर 
विश्वसंचार

Monkeys Drought Behavior | भीषण दुष्काळामुळे माकडांनी पोटच्या पिल्लांना सोडले वाऱ्यावर

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जंगलातील वनस्पती, कीटक आणि पांढऱ्या चेहऱ्याचे ‘कपुचिन’ माकडांसारखे मोठे प्राणी हे निसर्गातील बदलांशी जुळवून घेण्यात अत्यंत हुशार मानले जातात. परंतु, २०१५ मध्ये ‘एल निनो’ मुळे पडलेल्या एका अत्यंत भीषण दुष्काळादरम्यान, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या मानववंशशास्त्रज्ञ ‘पेरी’ यांना या माकडांचे असे काही वर्तन पाहायला मिळाले, जे कधी काळी असंभव मानले जात होते. सामान्य परिस्थितीत कपुचिन माकडांच्या माता आपल्या पिल्लांबद्दल अत्यंत समर्पित आणि प्रेमळ असतात, असे पेरी यांनी स्पष्ट केले. मात्र, २०१५ च्या दुष्काळात परिस्थिती बदलली. पेरी सांगतात, ‘मी पाहिलं की लहान पिल्लं जमिनीवर पडून केविलवाणी रडत होती आणि त्यांच्या माता त्यांच्याकडे खाली बघून ‘आता हे आपल्याने सहन होत नाही’ अशा थाटात पिल्लांना तिथेच सोडून निघून जात होत्या.’

‘कपुचिन माकडांच्या सहनशीलतेलाही एक मर्यादा आहे,’ असे पेरी म्हणाल्या. ‘आपल्याला आता याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कारण, हवामानाचे सर्व अंदाज हेच सांगत आहेत की, भविष्यात हवामानातील अनपेक्षित बदल आणि तीव्र संकटं अधिक वाढणार आहेत.’ मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटचे पर्यावरणतज्ज्ञ ‘ऑड जेकब्सन’ २०१६ मध्ये (भीषण दुष्काळाच्या एका वर्षानंतर) लोमास बार्बुडाल येथे या माकडांवर अभ्यास करत होते. त्यांचा मुख्य उद्देश जंगलातील कपुचिन माकडांचे १२ वेगवेगळे गट कसे वावरतात, हे समजून घेणे हा होता. परंतु, आता ते हवामानातील तीव्र बदलांमुळे या माकडांच्या वर्तनावर आणि त्यांच्या सामाजिक संरचनेवर कसा परिणाम होतो, याचा शोध घेत आहेत.

‘नेचर इकॉलॉजी अँड इव्होल्युशन’ या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात जेकब्सन आणि पेरी यांच्यासह इतर सहलेखकांनी माकडांच्या ३३ वर्षांच्या भौगोलिक स्थानाच्या डेटाचे विश्लेषण केले. याद्वारे हवामानातील बदलांचा माकडांच्या जीवनाशी काय संबंध आहे, हे त्यांनी शोधून काढले. यासाठी त्यांनी माकडांचे रोजचे फळांचे सेवन, त्यांच्या गटाचे फिरण्याचे क्षेत्र आणि अन्नाच्या शोधात ते रोज किती अंतर प्रवास करतात, अशा विविध घटकांचे निरीक्षण केले. शेवटी, माकडांचे हे वेगवेगळे गट एकमेकांशी कसे संवाद साधतात किंवा वागतात, हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी ‘हायराॅर्किकल सोशल रिलेशन्स मॉडेल’चा वापर केला. या मॉडेलमुळे वैज्ञानिकांना दोन वेगवेगळे माकडांचे गट जंगलात कसे फिरतील आणि त्यांच्या सीमा कुठे एकमेकांना छेदतील, याचा अंदाज लावणे शक्य झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT