Tea Coffee Side Effects | रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेतल्याने होऊ शकते रक्ताची कमतरता pudhari file photo
विश्वसंचार

Tea Coffee Side Effects | रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेतल्याने होऊ शकते रक्ताची कमतरता

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीयांच्या जीवनात चहा हे केवळ एक पेय नसून ते हल्ली एक व्यसन किंवा सवय बनली आहे. पाहुणचारापासून ते मनाचा थकवा दूर करण्यापर्यंत चहाचा मोठा वाटा असतो. दुसरीकडे, कॉर्पोरेट मीटिंग्स आणि तरुणांच्या डेटस्मुळे कॉफीची लोकप्रियताही झपाट्याने वाढत आहे. अनेकांसाठी चहा किंवा कॉफी हे ‘मॉर्निंग ड्रिंक’ आहे, जे झोप उडवून उत्साह देते. मात्र, सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी हे पेय पिणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

डॉक्टरांच्या मते, रिकाम्या पोटी चहा घेतल्याने अ‍ॅसिडिटी होणे निश्चित आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चहा आणि कॉफीमध्ये असलेले ‘कॅफीन’. कॅफीन हा एक आम्लयुक्त पदार्थ आहे. जेव्हा तुम्ही काहीही न खाता थेट चहा पिता, तेव्हा पोटातील अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. ज्यांना आधीच अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी ही चूक कधीच करू नये. दुसरे कारण अधिक गंभीर असून ते थेट तुमच्या रक्तातील लोहाच्या (आयर्न) प्रमाणाशी संबंधित आहे. भारतातील मोठी लोकसंख्या शाकाहारी आहे, ज्यांच्यामध्ये आधीच लोहाची कमतरता असते.

चहा-कॉफीमधील कॅफीन अन्नातील लोह शरीरात शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते. जर तुम्ही नाश्त्यासोबत किंवा रिकाम्या पोटी चहा घेतला, तर अन्नातून मिळणारे थोडेफार लोहही शरीराला मिळत नाही. यामुळे लोहाची पातळी खालावते आणि पर्यायाने रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) निर्माण होते. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, श्वास फुलणे आणि डोळे किंवा चेहरा निस्तेज दिसणे अशा समस्या उद्भवतात. लोह हे शरीराच्या ताकदीचा मुख्य घटक असल्याने, चहाची ही सवय तुमची ताकद कमी करू शकते. रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिण्याऐवजी आधी पाणी प्यावे किंवा काहीतरी हलका आहार घ्यावा. शाकाहारी लोकांनी त्यांच्या लोहाच्या पातळीची काळजी घेण्यासाठी नाश्त्याच्या लगेच आधी किंवा नंतर चहा पिणे टाळणे हिताचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT