कृष्णविवर तार्‍याला गिळंकृत करण्यापूर्वीचे टिपले नाट्यमय क्षण Pudhari File Photo
विश्वसंचार

कृष्णविवर तार्‍याला गिळंकृत करण्यापूर्वीचे टिपले नाट्यमय क्षण

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी संगणकीय सिम्युलेशनच्या मदतीने एका न्यूट्रॉन तार्‍याच्या कृष्णविवरात विलीन होण्याच्या अंतिम क्षणांचे रहस्य उलगडले आहे. या प्रक्रियेत निर्माण होणार्‍या शक्तिशाली लहरी आणि रेडिओ सिग्नल भविष्यात पृथ्वीवरूनही टिपता येण्याची शक्यता आहे.

अंतराळात अनेक अद्भुत आणि विनाशकारी घटना घडत असतात; परंतु कृष्णविवराने एखाद्या तार्‍याला गिळंकृत करण्यासारखे अधिक नाट्यमय द़ृश्य क्वचितच असेल. आता, प्रगत संगणकीय सिम्युलेशनच्या मदतीने, शास्त्रज्ञांनी या खगोलीय महाविनाशाचे अत्यंत जवळून दर्शन घेतले आहे, तो कसा दिसू शकतो आणि त्याचा आवाज कसा असू शकतो, याचाही अंदाज बांधला आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील सैद्धांतिक खगोल भौतिकशास्त्रज्ञ इलियास मोस्ट यांच्या नेतृत्वाखालील खगोलशास्त्रज्ञांच्या एका चमूने न्यूट्रॉन तार्‍याच्या कृष्णविवरात विलीन होण्यापूर्वीच्या काही मिली सेकंदांचे मॉडेल तयार केले आहे.

न्यूट्रॉन तारा म्हणजे एखाद्या मोठ्या तार्‍याच्या स्फोटानंतर मागे राहिलेला अत्यंत घन गाभा असतो. मार्च महिन्यात ‘द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, त्या अंतिम क्षणांमध्ये तार्‍याचा पृष्ठभाग भूकंपाच्या वेळी जमिनीला जसे तडे जातात, त्याप्रमाणेच दुभंगतो. न्यूट्रॉन तारा कृष्णविवराच्या गर्तेत नाहीसा होण्यापूर्वी, आपल्याला ज्ञात असलेल्या सर्वात शक्तिशाली शॉक वेव्हज बाहेर फेकल्या जातात, जणू काही तो तार्‍याचा अखेरचा हिंसक निरोपच असतो. या चमूच्या संशोधनातून हेदेखील स्पष्ट होते की, या खगोलीय टकरीतून अंतराळात कशा प्रकारचे संकेत पाठवले जाऊ शकतात, जे संकेत पृथ्वीवरील आणि अंतराळातील दुर्बिणी वापरून खगोलशास्त्रज्ञ भविष्यात शोधू शकतील.

‘या सिम्युलेशनपूर्वी, लोकांना वाटायचे की न्यूट्रॉन तार्‍याला अंड्याप्रमाणे फोडता येऊ शकते; परंतु ते फुटण्याचा आवाज ऐकू येईल का, हा प्रश्न त्यांनी कधी विचारला नाही,’ असे मोस्ट यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ‘आमचे संशोधन असे भाकीत करते की, होय, तुम्ही तो आवाज ऐकू शकता किंवा रेडिओ सिग्नलच्या रूपात तो ओळखू शकता.’ सिम्युलेशनमध्ये असे दिसून येते की, न्यूट्रॉन तारा गिळंकृत होण्यापूर्वी, कृष्णविवराचे प्रचंड गुरुत्वाकर्षण त्याच्या पृष्ठभागाला खेचते, ज्यामुळे तार्‍यावर विनाशकारी भूकंप होतात. यामुळे तार्‍याचे शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र कंप पावते आणि पिळवटले जाते, ज्यातून खगोलशास्त्रज्ञ ‘अल्फव्हेन लहरी’ म्हणतात त्या निर्माण होतात. मग, न्यूट्रॉन तारा कृष्णविवरात गडप होण्यापूर्वी, या लहरी एका शक्तिशाली स्फोटात रूपांतरित होतात, ज्यामुळे ‘फास्ट रेडिओ बर्स्ट’ (Fast Radio Burst - FRB) म्हणून ओळखल्या जाणार्‍या रेडिओ लहरींचा स्फोट बाहेर पडतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT