long distance fish journey | 7000 मैलांचा प्रवास करणारा दोराडो मासा  
विश्वसंचार

long distance fish journey | 7000 मैलांचा प्रवास करणारा दोराडो मासा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, अ‍ॅमेझॉन नदी प्रचंड वेगाने फुगते. या वाढत्या प्रवाहासोबत एक अनोखी आणि हजारो वर्षांची परंपरा पुन्हा सुरू होते. ‘दोराडो’ कॅटफिशचा (गिल्डेड कॅटफिश) अविश्वसनीय प्रवास. सुमारे 7,000 मैलांचा हा प्रवास जगातील सर्वात लांब गोड्या पाण्यातील स्थलांतर मानला जातो. मात्र, आज हीच अद्भूत जीवनयात्रा गंभीर धोक्यात आली आहे.

‘दोराडो’ हा “गोलायथ” कॅटफिश कुटुंबातील मासा अँडीज पर्वत परिसरातील उगमस्थानी अंडी घालतो. त्यानंतर त्याची लहान पिल्ले हजारो मैलांचा प्रवास करत नदीच्या प्रवाहासोबत खाली येत अटलांटिक महासागर जवळील खारट पाण्यात पोहोचतात. येथे त्यांना वाढीसाठी उत्तम पोषण मिळते. हे मासे तब्बल सहा फूट लांब आणि 200 पाऊंड वजनाचे होऊ शकतात. एक ते दोन वर्षांनी ते पुन्हा अँडीजच्या पायथ्याशी परत जातात आणि प्रजनन करतात, असा हा जीवनचक्राचा अखंड प्रवास आहे. मात्र, या नैसर्गिक मार्गावर आता जलविद्युत प्रकल्पांची धरणे मोठा अडथळा ठरत आहेत. नदीचे तुकडीकरण झाल्याने माशांना त्यांच्या प्रजनन स्थळांपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. यामुळे ‘दोराडो’च्या संख्येत झपाट्याने घट होत आहे.

2019 मधील एका अभ्यासानुसार, बोलिव्हिया येथे केवळ 15 वर्षांत या माशांची संख्या 80 टक्केने घटली. विशेष म्हणजे, खालील प्रवाहात ब्राझीलमध्ये बांधलेल्या धरणांचा त्यावर थेट परिणाम झाला. या गंभीर संकटाला उत्तर देण्यासाठी ब्राझीलच्या पुढाकाराने सहा देशांनी एकत्र येत आंतरराष्ट्रीय कृती आराखड्यावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. या आराखड्याचा उद्देश नदीचे नैसर्गिक प्रवाह जपणे आणि ‘दोराडो’सह इतर सहा स्थलांतरित कॅटफिश प्रजातींचे संरक्षण करणे हा आहे. या उपक्रमात वैज्ञानिक, स्थानिक समुदाय आणि आदिवासी गटांचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे. कारण अ‍ॅमेझॉन परिसरात सुमारे 47 दशलक्ष लोक राहतात आणि त्यांच्या उपजीविकेसाठी मत्स्यव्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे.

‘दोराडो’ माशाचा संघर्ष हा मानव आणि निसर्ग यांच्यातील संतुलन राखण्याची गरज अधोरेखित करतो. अ‍ॅमेझॉनमधील हा नवीन कृती आराखडा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यात इतर देशांसाठीही तो आदर्श ठरू शकतो. योग्य पावले उचलली, तर अजूनही या अद्भूत प्रवासाला वाचवण्याची संधी शिल्लक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT