Arunachal Pradesh Girl | आम्हाला चायनीज म्हणू नका...! अरुणाचलच्या चिमुकलीचा भावुक व्हिडीओ  
विश्वसंचार

Arunachal Pradesh Girl | आम्हाला चायनीज म्हणू नका...! अरुणाचलच्या चिमुकलीचा भावुक व्हिडीओ

पुढारी वृत्तसेवा

इटानगर : भारत हा आपल्या विविधतेसाठी जगभरात ओळखला जातो. परंतु, कधी कधी हीच विविधता आपल्याच लोकांमध्ये निव्वळ गैरसमजामुळेही भेदभावाचे कारण बनते. अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील एका चिमुकलीचा अत्यंत भावुक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, तिने देशासमोर असा प्रश्न उपस्थित केला आहे, ज्याने प्रत्येक संवेदनशील भारतीयाला विचार करायला भाग पाडले आहे.

सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या व्हिडीओमध्ये ही लहान मुलगी अत्यंत निरागसपणे, पण तितक्याच ठाम शब्दांत आपले दुःख व्यक्त करताना दिसत आहे. ती म्हणते, ‘‘आम्हीसुद्धा भारतीयच आहोत... आम्हाला चायनीज म्हणू नका.’’ तिचे हे एकच वाक्य अशा प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आघात करते, जे ईशान्य भारतातील (नॉर्थ-ईस्ट) लोकांना त्यांच्या चेहरेपट्टीवरून किंवा शारीरिक ठेवणीवरून परदेशी समजण्याची चूक करतात. ईशान्य भारतातील एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारच्या वंशवादाचा किंवा वर्णद्वेषाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही.

अनेक वर्षांपासून पूर्वोत्तर भारतातील नागरिक आपल्याच देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हा भेदभाव सहन करत आले आहेत. कधी त्यांना ‘चायनीज’ म्हणून हिणवले जाते, तर कधी त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या जातात. या चिमुकलीच्या व्हिडीओने हे कटू सत्य पुन्हा एकदा सर्वांसमोर आणून उभे केले आहे. भारताचे सौंदर्य हे त्याच्या विविधतेतच दडलेले आहे, याची आठवण या चिमुकलीचा हा साधा-सरळ संदेश करून देतो. ईशान्य भारतातील नागरिक हा भारताचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना आपले भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. वारंवार घडणाऱ्या वर्णद्वेषी घटनांवर हा व्हिडीओ एक सणसणीत चपराक असून, कोणाच्याही राहणीमानावरून किंवा चेहरेपट्टीवरून त्याच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाहीत, हेच हा व्हिडीओ दाखवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT