वॉशिंग्टन : पाऊस कसा पडतो, असं विचारलं तर कुणीही सांगेल, जमिनीवरील पाण्याची वाफ होते, ती ढगात जाऊन त्याचे ढग होतात आणि नंतर या ढगांमधून पाऊस पडतो. ढगांमुळे कोसळणारा हा पाऊस तुम्ही पाहिला आहे ; पण कधी कोणत्या माणसामुळे पाऊस पडल्याचं ऐकलं तरी आहे का? असा माणूस जो कुठेही, कधीही पाऊस पाडू शकत होता. शेवटी तो ‘द रेन मॅन’ म्हणून प्रसिद्ध झाला. आश्चर्य म्हणजे या ‘रेन मॅन’चे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही.
अमेरिकेतील डोनाल्ड ऊर्फ डॉन डेकर नावाची व्यक्ती. चोरीच्या आरोपात तुरुंगात शिक्षा भोगत होती. त्याचवेळी त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला. म्हणून अंत्यसंस्कारासाठी त्याला जेलमधून बाहेर काढण्यात आले. त्यावेळी तो आपल्या एका मित्राच्या घरी थांबला. तिथे आणखी काही लोकही होते. त्यावेळी त्या घरात छत गळू लागले. सर्वांनी घराची नीट पाहणी केली, तर घरात बाहेरून पाणी येईल, पाण्याची गळती होईल अशी कोणतीच जागा नव्हती. पाणी तिथेच गळत होते, जिथे डॉन डेकर बसला होता. तो घरातून बाहेर येताच पाणी गळणं थांबलं आणि सर्व नीट झालं.
त्यानंतर पुन्हा अशीच घटना घडली, ती रेस्टॉरंटमध्ये. तो तिथे बसला असता तिथंही अचानक पाऊस पडू लागला आणि जसा तो रेस्टॉरंटमधून बाहेर आला, तसा पाऊस थांबला. नंतर त्याला पुन्हा जेलमध्ये आणण्यात आलं. तिथंही अशीच घटना घडली. आश्चर्य म्हणजे, या पावसात फक्त ती व्यक्ती भिजायची. त्यामुळे सर्वजण घाबरले. अखेर तिथे पाद्रीला बोलावण्यात आले. पाद्रीने ‘बायबल’ वाचायला सुरुवात करतात संपूर्ण खोली पावसाने भिजली; पण बायबल मात्र कोरडे होते. या दिवशी पाऊस आपोआप थांबला आणि डॉन डेकरच्या आयुष्यातील ही अनोखी शक्तीही गेली. पेन्सिलव्हेनियामधील 1983 सालातील ही विचित्र घटना आहे. ज्याचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही. या विचित्र शक्तीबाबत या व्यक्तीलाही काही माहिती नव्हते. काही जणांनी या घटनेच्या सत्यतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे, तर काहींनी याला पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी म्हटले आहे.