NASA UFO Photos | ‘नासा’कडे आहेत यूएफओचे फोटो  
विश्वसंचार

NASA UFO Photos | ‘नासा’कडे आहेत यूएफओचे फोटो

पुढारी वृत्तसेवा

न्‍यूयॉर्क : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे मुख्य प्रशासक जॅरेड आयझॅकमन यांनी यूएफओ (अनआइडेंटिफाइड फ्लाईंग ऑब्जेक्टस्‌) संदर्भात एक खळबळजनक खुलासा केला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, नासाने अंतराळात अशा काही गूढ वस्तूंचे फोटो टिपले आहेत, त्‍यांचे स्पष्टीकरण धूमकेतू किंवा कोणतीही नैसर्गिक खगोलीय घटना म्हणून देता येणार नाही.

गेल्या डिसेंबरमध्ये नासाची धुरा सांभाळणारे अब्जाधीश उद्योजक आणि नागरी अंतराळवीर जॅरेड आयझॅकमन यांनी पत्रकार जॅक गॉर्डन यांच्या पॉडकास्टमध्ये ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘आम्ही अंतराळातून काही अशी चित्रे गोळा केली आहेत, त्‍यातील डेटा पाहता त्या वस्तू नेमक्या काय आहेत हे आम्हाला अद्याप समजलेले नाही. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील या विषयाबाबत अतिशय उत्सुक आहेत.’

आयझॅकमन यांनी स्पष्ट केले की, जरी त्यांच्याकडे परग्रहीय जीवनाचा (एलियन लाईफ) कोणताही ठोस पुरावा किंवा कोसळलेल्या यूएफओचे अवशेष नसले, तरी आपल्या आयुष्यातच आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचू की विश्वात सर्वत्र जीवन आहे. तसेच, परग्रहीय जीवनाचा सर्वात मोठा पुरावा मंगळ ग्रहावर (मार्स) असू शकतो, त्‍या ठिकाणी नासाचे रोव्हर नमुने गोळा करत आहेत. हे नमुने पृथ्वीवर आणल्यास तिथे सूक्ष्मजीव असल्याचे सिद्ध होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, नासावर अनेकदा असाही आरोप केला गेला आहे की, ते फोटो सार्वजनिक करण्यापूर्वी त्यातून यूएफओचे पुरावे मिटवून टाकतात. २००१ मध्ये नासाच्या एका माजी कंत्राटदाराने आणि अपोलो १४ चे अंतराळवीर एडगर मिचेल यांनीही नासाने परग्रहीय तंत्रज्ञानाचे पुरावे लपवल्याचे दावे केले होते. या पार्श्वभूमीवर, आयझॅकमन यांनी सांगितले की, चंद्रावर जाणाऱ्या आगामी 'आर्टेमिस' मोहिमेतील प्रत्येक लँडर आणि रोव्हरला हाय-डेफिनिशन कॅमेरे लावले जातील, जेणेकरून जगाला अंतराळ मोहिमांचे स्पष्ट आणि निर्विवाद पुरावे मिळतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT