Fluoride brain effects | फ्लोराईडचा मेंदूवर खरोखरच परिणाम होतो? 
विश्वसंचार

Fluoride brain effects | फ्लोराईडचा मेंदूवर खरोखरच परिणाम होतो?

पुढारी वृत्तसेवा

लंडन : पिण्याचे पाणी आणि दातांच्या आरोग्यासाठी वापरल्या जाणार्‍या उत्पादनांमध्ये (उदा. टूथपेस्ट) फ्लोराईडचा वापर वर्षानुवर्षे केला जात आहे. फ्लोराईड दातांची किड रोखण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. मात्र, फ्लोराईडमुळे मेंदूवर विपरीत परिणाम होतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. आता एका नवीन संशोधनाने यावर प्रकाश टाकला आहे.

जर्नल प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, फ्लोराईडयुक्त पाण्याचे सेवन केल्याने मेंदूवर कोणताही थेट परिणाम होत नाही. सामान्यतः फ्लोराईड आरोग्यासाठी धोकादायक नसते. परंतु, त्याचे प्रमाण मर्यादेबाहेर गेल्यास मात्र समस्या उद्भवू शकतात. फ्लोराईड शरीरात गेल्यावर ते हाडे आणि दातांसह विविध उतींमध्ये पसरते. सामान्य पातळीवर ते मेंदूवर परिणाम करत नाही. परंतु, दीर्घकाळ आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास पुढील समस्या उद्भवू शकतात : ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस : फ्लोराईडच्या अतिवापरामुळे शरीरात ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ वाढू शकतो.

याचा परिणाम न्यूरोट्रान्समिटर्सवर होतो, जे मेंदूच्या पेशींमधील संवादासाठी महत्त्वाचे असतात. थायरॉईडवर परिणाम : फ्लोराईडच्या उच्च प्रमाणामुळे थायरॉईड ग्रंथींच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. थायरॉईडमध्ये बिघाड झाल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम मेंदूच्या आरोग्यावर होतो. बहुतेक लोकांसाठी फ्लोराईड सुरक्षित आहे. परंतु, काही परिस्थितीत काळजी घेणे आवश्यक आहे: भूजल वापरणारी क्षेत्रे : ज्या भागात जमिनीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो, तिथे फ्लोराईडचे प्रमाण नैसर्गिकरीत्या जास्त असू शकते.

फ्लोरोसिसचा धोका : दीर्घकाळ उच्च फ्लोराईडयुक्त पाणी प्यायल्याने ‘फ्लोरोसिस’ (हाडे आणि दात ठिसूळ होणे) सारखे आजार होऊ शकतात. बालक आणि गर्भवती महिला : याचा सर्वाधिक परिणाम लहान मुले आणि गर्भवती महिलांवर होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. थोडक्यात, दैनंदिन पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण अत्यंत सामान्य असते, जे मानवी मेंदूसाठी धोकादायक नसते. फ्लोराईडचे फायदे तोट्यांपेक्षा जास्त आहेत. मात्र, त्याचे प्रमाण नियंत्रित असणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT