Do trees feel pain | पाने, फांद्या तोडल्यावर झाडांना वेदना होतात का? 
विश्वसंचार

Do trees feel pain | पाने, फांद्या तोडल्यावर झाडांना वेदना होतात का?

वैज्ञानिकांनी उलगडले पानांच्या चीत्कारचे रहस्य!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : जेव्हा आपल्याला छोटीशी दुखापत होते, तेव्हा आपल्याला वेदना जाणवतात. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, की जेव्हा आपण झाडाची पाने खुडतो किंवा प्राणी त्यांना ओरबाडून खातात, फांद्या तोडल्या जातात तेव्हा झाडांना काय वाटत असेल?, अशा प्रश्नांवर वैज्ञानिकांनी उत्तर शोधून काढले आहे. झाडांना वेदना का होत नाहीत? या प्रश्नावर ब्रिटानिका आणि डिस्कव्हर मॅगझिनमधील अहवालांनुसार, झाडांना मानवाप्रमाणे वेदना (पेन) होत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे झाडांकडे मानवाप्रमाणे मेंदू (बे्रन) आणि मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टिम) नसते. वेदना हा एक भावनिक आणि न्यूरोलॉजिकल अनुभव आहे, जो मेंदूमध्ये प्रक्रिया होतो. झाडांकडे अशी कोणतीही केंद्रीय यंत्रणा नाही.

पण झाडे धोका ओळखतात!

जरी झाडांना वेदना होत नसली, तरी ती अत्यंत संवेदनशील असतात. 2018 मध्ये झालेल्या एका अभ्यासात असे आढळले की, जेव्हा एखादी अळी किंवा कीटक पान कुरतडतो, तेव्हा झाड संपूर्ण शरीरात कॅल्शियम लहरी (कॅल्शियम वेव्ह) पाठवते. हे एक प्रकारचे इलेक्ट्रिकल सिग्नल आहेत, जे झाडाला सावध करतात.

झाडांची अनोखी संरक्षण यंत्रणा

जेव्हा झाडाला समजते की त्याच्यावर हल्ला झाला आहे, तेव्हा ते स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक गोष्टी करते. झाड लगेच टॅनिन आणि फेनोल्ससारखी रसायने वाढवते, ज्यामुळे पानांची चव कडू लागते आणि कीटक ते खाणे थांबवतात.

दुसर्‍या झाडांना इशारा

सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे, ज्या झाडावर हल्ला होतो, ते हवेत व्होलाटाईल ऑरगॅनिक कंपाऊंडस् (VOCs) सोडते. हा वायू शेजारील झाडांना पोहोचतो आणि ती झाडेही स्वतःची संरक्षण यंत्रणा सक्रिय करतात.

अल्ट्रासोनिक किंचाळी?

तेलअवीव युनिव्हर्सिटीच्या 2019 मधील संशोधनात असे दिसून आले की, जेव्हा झाडांना पाणी मिळत नाही (दुष्काळ), तेव्हा ती हाय-फ्रिक्वेन्सी आवाज (20-100khz) काढतात. याला काही माध्यमांनी झाडांची किंचाळी म्हटले. पण वैज्ञानिकांच्या मते, हा वेदनेचा आवाज नसून केवळ तणावाचा (स्टे्रस) संकेत आहे, जो मानवी कानांना ऐकू येत नाही. थोडक्यात सांगायचे तर, झाडे मानवाप्रमाणे रडत नाहीत किंवा त्यांना वेदना होत नाहीत. मात्र, ती निसर्गातील एक अत्यंत प्रगत यंत्रणा आहे, जी केवळ जगण्यासाठी (सर्व्हाव्हल) सातत्याने प्रयत्न करत असते आणि एकमेकांशी संवाद साधत असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT