लंडन : नार्वेजियन लॉबस्टरसारख्या म्हणजेच मोठ्या झिंग्यांसारख्या कवचधारी जलचरांना वेदना जाणवतात का, यावर शास्त्रज्ञांमध्ये दीर्घकाळापासून चर्चा सुरू होती. मात्र, आता एका नवीन संशोधनाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. मानवांसाठी वापरली जाणारी वेदनाशामक औषधे लॉबस्टरमधील वेदनांचे संकेत कमी करण्यास मदत करतात, असे या संशोधनातून दिसून आले आहे. या संशोधनामुळे उकळत्या पाण्यात टाकून त्यांना मारण्याच्या पद्धतीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘सायंटिफिक रिपोर्टस्’ या शोधपत्रिकेत 13 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, एस्पिरिन आणि लिडोकेन या औषधांमुळे लॉबस्टरची वेदनेप्रती होणारी प्रतिक्रिया लक्षणीयरीत्या कमी झाली. युनिव्हर्सिटी ऑफ गॉथेनबर्गच्या संशोधकांनी 105 नार्वेजियन लॉबस्टरवर हा अभ्यास केला. संशोधनासाठी त्यांचे विविध गट करण्यात आले होते: ज्या लॉबस्टरना इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला, त्यांनी सुटकेसाठी आपली शेपटी जोरात झटकली. ही क्रिया केवळ शॉक दिलेल्या गटातच दिसून आली. ज्या लॉबस्टरना शॉक देण्यापूर्वी एस्पिरिन किंवा लिडोकेन ही वेदनाशामक औषधे दिली होती, त्यांच्या प्रतिसादात मोठी घट झाली.
एस्पिरिन दिलेल्या 13 पैकी केवळ 3, तर लिडोकेन दिलेल्या 13 पैकी 7 लॉबस्टरनी शेपटी झटकली. संशोधकांचे म्हणणे आहे की, जर ही क्रिया केवळ स्नायूंच्या आकुंचनामुळे ( Electrically stimulated) असती, तर वेदनाशामक औषधांचा त्यावर परिणाम झाला नसता. औषधांमुळे ही प्रतिक्रिया कमी होणे याचा अर्थ असा की, या प्राण्यांना वेदनांची जाणीव होते आणि औषधे त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचणारे वेदनेचे संकेत रोखतात. या संशोधनामुळे लॉबस्टर आणि खेकड्यांसारख्या प्राण्यांना दिल्या जाणार्या वागणुकीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्वीडनमधील प्राणिशास्त्राच्या प्राध्यापिका लिन स्नेडन म्हणाल्या, ‘मानवांसाठी बनवलेली औषधे या प्राण्यांवरही काम करतात, यावरून आपली शरीररचना किती साम्य दर्शवते हे समजते. त्यामुळेच खाण्यासाठी वापरल्या जाणार्या पशु-पक्ष्यांप्रमाणेच या जलचरांना मारताना किंवा हाताळताना त्यांच्या वेदनांचा विचार करणे आवश्यक आहे.’
सध्या नॉर्वे, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत लॉबस्टरना जिवंत उकळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनमध्येही अशाच प्रकारच्या कायद्याचा विचार सुरू आहे. जिवंत उकळण्याऐवजी ‘इलेक्ट्रिकल स्टनिंग’ (विजेच्या साहाय्याने बेशुद्ध करणे) हा अधिक मानवी पर्याय असू शकतो का, यावर आता संशोधन आणि उद्योग क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. डेव्हिड फॉस्टर वॉलेस यांच्या 2004 मधील गाजलेल्या ‘कन्सिडर द लॉबस्टर’ या निबंधातील संशयाला आता विज्ञानाने पुष्टी दिली असून, या निष्कर्षांमुळे जगभरात लॉबस्टरच्या सुरक्षिततेसाठी नवीन कायदे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.