Angle-stemmed Myrtle | नामशेष होत असलेल्या ‘अँगल-स्टेम्ड मर्टल’ झाडाच्या ‘डीएनए’चे जतन Pudhari File Photo
विश्वसंचार

Angle-stemmed Myrtle | नामशेष होत असलेल्या ‘अँगल-स्टेम्ड मर्टल’ झाडाच्या ‘डीएनए’चे जतन

पुढारी वृत्तसेवा

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या एका झाडाचे डीएनए जतन करण्यासाठी त्याचे शेंडे गोठवले आहेत. ‘अँगल-स्टेम्ड मर्टल’ असे या झाडाचे नाव असून, जगामध्ये फक्त 380 झाडे शिल्लक आहेत, त्यापैकी 300 झाडे क्वीन्सलँडच्या लोगान शहरात आहेत.

हे संशोधन करणार्‍या क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधक अ‍ॅलिस हेवर्ड यांच्या मते, या झाडाचे विविध जीन्स क्रायोप्रिझर्व्ह म्हणजेच गोठवून ठेवण्यात यश मिळाल्यास, भविष्यात ही प्रजाती पूर्णपणे नामशेष झाली, तरी ती पुन्हा वाढवता येऊ शकते. हेवर्ड यांनी सांगितले की, ‘वनस्पतींचे नैसर्गिक अधिवास जपणे सर्वात महत्त्वाचे आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो आणि सांस्कृतिक वारसाही जपला जातो.’ परंतु, ‘क्रायोबँकमध्ये या प्रजातीचे डीएनए जतन केल्याने, ते एक प्रकारे या प्रजातीसाठी ‘बॅकअप स्टोरेज’ म्हणून काम करेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘अँगल-स्टेम्ड मर्टल’ हे एक लहान झाड असून, ते ऑस्ट्रेलियातील कोरड्या पर्जन्यवनांमध्ये (dry rainforests) पाण्याच्या प्रवाहांजवळ वाढते. याची पाने चमकदार, देठ चौकोनी आणि फळे गोड व गर असलेल्या असतात. ही फळे वटवाघुळे आणि पक्ष्यांसाठी खाद्य असू शकतात. या झाडांमुळे नदीकाठ स्थिर राहण्यास मदत होते आणि जैवविविधता वाढते, असे हेवर्ड यांचे मत आहे. 2010 पासून ‘अँगल-स्टेम्ड मर्टल’ची संख्या वेगाने कमी होत आहे. यामागे अधिवासाचा नाश, वाढते तापमान आणि ‘मर्टल रस्ट’ नावाचा बुरशीजन्य रोग ही प्रमुख कारणे आहेत.

‘ऑस्ट्रोपसिनिया सिडी’ नावाच्या या बुरशीमुळे झाडांच्या नवीन वाढणार्‍या भागांवर हल्ला होतो. यामुळे पानांचा आकार बदलतो, वाढ खुंटते आणि त्यांची प्रजनन क्षमता कमी होते. या प्रजातीला वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ एक अशी पद्धत विकसित करत आहेत, ज्यामुळे झाडाचे उतक (tissues) गोठवता येईल आणि भविष्यात जेव्हा गरज असेल तेव्हा त्यातून पूर्ण झाड पुन्हा तयार करता येईल. या झाडांच्या बिया ‘मर्टल रस्ट’मुळे आधीच कमकुवत झाल्या आहेत आणि त्या दीर्घकाळ गोठवून ठेवणे शक्य नाही, म्हणून बियांऐवजी शेंड्यांचा वापर केला जात आहे, असेही हेवर्ड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT