वॉशिंग्टन : अमेरिकेतील ‘अॅटलस डेटा स्टोरेज’ या बायोटेक कंपनीने डेटा स्टोरेजच्या क्षेत्रात एक क्रांती घडवून आणली आहे. कंपनीने कृत्रिम डीएनए ( Synthetic DNA) वर आधारित स्टोरेज सिस्टीम लाँच केली असून, ती पारंपरिक मॅग्नेटिक टेपच्या तुलनेत 1,000 पट जास्त डेटा साठवू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
या नवीन उत्पादनाला ‘अॅटलस इऑन 100’ असे नाव देण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान मानवतेचे ‘न भरून येणारे दस्तावेज’ हजारो वर्षांसाठी सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल : कौटुंबिक फोटो आणि वैयक्तिक आठवणी, महत्त्वाचा वैज्ञानिक डेटा आणि कॉर्पोरेट रेकॉर्डस्, सांस्कृतिक वारसा, डिजिटल कलाकृती, चित्रपट आणि संगीत, दुर्मीळ हस्तलिखिते आणि मास्टर कॉपीज. अॅटलस डेटा स्टोरेजचे संस्थापक बिल बान्याई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘हे उत्पादन म्हणजे विविध क्षेत्रांतील 10 वर्षांहून अधिक काळ केलेल्या संशोधनाचा आणि नवनवीन प्रयोगांचा परिणाम आहे.
दीर्घकालीन डेटा जतन करणे, एआय मॉडेल्ससाठी माहिती सुरक्षित ठेवणे आणि उच्च मूल्याच्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करणे, यासाठी आम्ही नवीन उपाय शोधत आहोत. ‘सध्या डेटा साठवण्यासाठी वापरले जाणारे हार्ड ड्राईव्ह किंवा मॅग्नेटिक टेप काही दशकांनंतर खराब होतात. मात्र, डीएनए स्टोरेज हे निसर्गातून प्रेरणा घेतलेले तंत्रज्ञान असल्याने ते अतिशय कमी जागेत प्रचंड माहिती साठवू शकते आणि हजारो वर्षे टिकू शकते.