DNA computer | पाण्याच्या थेंबात कॅल्क्युलेशन करणारा अनोखा ‘डीएनए कॉम्प्युटर’ विकसित 
विश्वसंचार

DNA computer | पाण्याच्या थेंबात कॅल्क्युलेशन करणारा अनोखा ‘डीएनए कॉम्प्युटर’ विकसित

आयर्लंडच्या मेनूथ विद्यापीठातील संशोधकांचा शोध

पुढारी वृत्तसेवा

लंडन: शास्त्रज्ञांनी एका अत्यंत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याच्या थेंबात किंवा टेस्ट ट्यूबमध्ये जटिल गणितीय गणना अर्थात आकडेमोड (कॅल्क्युलेशन) करू शकणारा डीएनए कॉम्प्युटर तयार केला आहे. पारंपरिक सिलिकॉन चिप्स आणि सततच्या विजेच्या पुरवठ्याशिवाय चालणारा हा एक प्रोग्रामेबल डीएनए कॉम्प्युटर आहे. या कॉम्प्युटरमध्‍ये अब्जावधी डीएनए रेणूंचा वापर केला जात असून, इतर जैविक संगणकीय प्रणालींप्रमाणे गणना सुरू ठेवण्यासाठी सतत ऊर्जेचा पुरवठा करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती ‘लाइव्ह सायन्स’ने संशोधनाच्या हवाल्याने दिली आहे.

विजेची गरज नाही

आयर्लंडच्या मेनूथ विद्यापीठातील संशोधकांनी हा ‘स्काफोल्डेड डीएनए कॉम्प्युटर’ (एसडीसी) तयार केला आहे. पारंपरिक संगणकांप्रमाणे यासाठी सतत विजेच्या ऊर्जेची गरज भासत नाही.

कशी होते प्रक्रिया?

यामध्‍ये डीएनएच्या स्टँड्सचा (ए, टी, सी, जी बेस जोड्या) वापर करून माहिती प्रोसेस केली जाते. पाण्याच्या थेंबात आणि मिठाच्या द्रावणात हे डीएनए स्ट्रँडस्‌ स्वतःहून एकत्र येतात (सेल्‍फ असेब्‍लिंग) आणि उष्णता दिल्यानंतर रासायनिक प्रक्रिया होऊन रेणू स्वतःहून सर्वात स्थिर संरचनेच्या दिशेने सरकतात, त्‍यामधून गणिताचे उत्तर बाहेर येते.

मोठ्या प्रमाणावर कॅल्क्युलेशन

या डीएनए प्रणालीने १० वेगवेगळ्या मोलेक्युलर प्रोग्रॅम्स यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, यात १००-बिटपर्यंतचे क्लिष्ट कॅल्क्युलेशन्स (बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार) अचूकपणे पार पाडले आहेत. भविष्यात ऊर्जा-कार्यक्षम डेटा स्टोरेज आणि शरीराच्या पेशींच्या आत काम करू शकणाऱ्या मोलेक्युलर सिस्टीमच्या विकासासाठी हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

७०० हून अधिक गणनांची चाचणी

प्रयोगांमध्ये या प्रणालीच्या मदतीने ७०० हून अधिक गणना करण्यात आल्या. बेरीज, तीनने गुणाकार, दोनने भागाकार तसेच आठ-बिट पॅरिटी डिटेक्शन यांसारख्या गणनांचा त्यात समावेश होता. उदाहरणार्थ, ‘१० अधिक ३’ ही साधी गणना सुमारे ३० सेकंदांत पूर्ण झाली. मात्र, मोठ्या गणनांना बराच वेळ लागला असून, सुमारे १.१ कोटी ते ३.४ कोटींच्या श्रेणीतील एका गणनेला तब्बल १४ तास लागले. या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा पुनर्वापर. काही प्रोग्राम २४ वेळांपर्यंत पुन्हा चालवण्यात आले. एका प्रयोगाची १.५ वर्षांनंतरही पुनरावृत्ती करण्यात आली. नमुना अंशतः वाळल्यानंतर त्यात पुन्हा पाणी घातल्यावर गणना करता आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT