सेऊल : लग्न ठरलं की घरात आनंदाचं वातावरण, लग्नाचा मंडप, पाहुण्यांची गर्दी, केक आणि सेलिब्रेशन.. हे सगळं पाहायला मिळतं; पण एका महिलेने याच सगळ्या गोष्टी घटस्फोटानंतर केल्या आहेत. लग्न मोडलं म्हणून दु:ख व्यक्त करण्याऐवजी तिनं आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात मोठ्या थाटात केली आहे. मैत्रिणींना बोलावलं, छान कपडे घातले, केक कापला आणि अगदी लग्नासारखा सोहळा साजरा केला. तिच्या या अनोख्या ‘डिव्होर्स पार्टी’चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
दक्षिण कोरियातील ३७ वर्षीय चो सेउंग-योन ही सिंगल मदर आणि कंटेट क्रिएटर आहे. डिवोर्सनंतर आयुष्य संपलं म्हणून खचण्याऐवजी तिनं त्याकडे नव्या सुरुवातीच्या रूपात पाहिलं. याच विचारातून तिनं खास ‘डिव्होर्स सेरेमनी’ आयोजित केली. या सोहळ्यात तिने जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. चो हिनं छान ड्रेस घातला, मित्रांसोबत फोटो काढले, मोठा केक कापला आणि उपस्थितांसमोर भाषणंही केलं. चो हिने या सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओमध्ये तिचे मित्र-मैत्रिणी टाळ्या वाजवताना, आनंद व्यक्त करताना आणि तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
या व्हिडीओवर लिहिलेले वाक्यही लक्ष वेधून घेत आहे. तुमचा घटस्फोटाचा सोहळा तुमच्या लग्नापेक्षाही शानदार होता, असं त्यात म्हटलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना चो हिनं आपल्या कठीण काळात साथ देणाऱ्या लोकांचे आभारही मानले. चोने सांगितलं की, घटस्फोट झालेल्या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा, अशी तिची इच्छा आहे. लग्न संपलं म्हणजे एखाद्या महिलेचं आयुष्य किंवा तिची ओळख संपली नाही. लग्नाच्या नात्यापलीकडेही स्वत: ची ओळख असते, हे तिला दाखवून द्यायचं होतं. त्यामुळे तिनं घटस्फोटाला अपयश न मानता नव्या आयुष्याचा टप्पा म्हणून साजरा केला.