रोम : प्राचीन रोमन संस्कृतीमधील अनेक इमारती, मंदिरांचे अवशेष सापडत असतात. आता पुरातत्त्व संशोधकांनी रोमच्या बाहेर 'व्हिला ऑफ क्विंटिली' इथे नुकतंच उत्खनन केले. या उत्खननात अतिशय अनोख्या वाईन फॅक्टरी किंवा वायनरीचे अवशेष सापडले आहेत. वाया अॅप्पिया अँटिका महामार्गावर स्थित ही तिसर्या शतकातील इमारत त्या काळातील प्राचीन वैभव आणि कलात्मकता दर्शवते.
पुरातन वास्तूवरील एका नवीन लेखात या शोधाशी संबंधित माहिती देण्यात आली आहे. लेडच्या पाण्याच्या पाईपवर कोरलेल्या नावांवरून असं कळतं की 24 हेक्टरचा प्राचीन रोमन व्हिला क्विंटिली बंधूंच्या मालकीचा होता, ज्यांनी इसवी सन 151 मध्ये रोममध्ये सल्लागार म्हणून काम केले होते. रोमन सम्राट कोमोडसने या भावांची हत्या केली. या व्हिलासह त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यामध्ये विविधरंगी संगमरवरी फरशा, उत्तम दर्जाची शिल्पे आणि प्रसिद्ध बाथहाऊस आहे. ही जागा सजावटी वास्तुकलेसाठी फार पूर्वीपासून ओळखली जाते. कोमोडसच्या कारकिर्दीत रथ शर्यतींसाठी एक सर्कस बांधली गेली होती, ज्याबद्दल फार लोकांना माहिती नव्हती. 2017-18 पासून या सर्कसच्या सुरुवातीच्या गेटच्या शोधासाठी उत्खनन सुरू करण्यात आले होते.
या उत्खननादरम्यान एका अनोख्या वायनरीच्या सुरुवातीच्या खुणा समोर आल्या होत्या. हा मोठा परिसर कोमोडसच्या कारकिर्दीनंतर सर्कसच्या ओपनिंग गेटवर बांधला होता. यामध्ये प्राचीन रोमन वायनरीमध्ये आढळणारी वैशिष्ट्य आहेत. फूटप्रेस, दोन वाईन प्रेस, द्राक्षे गोळा करण्यासाठी एक व्हॅट आणि ते साठवण्यासाठी मातीची मोठी भांडीही आहेत. या सोबतच वाईन फर्मेंट करण्यासाठी भुयारी तळघरही होते; पण या ठिकाणी जी सजावट व व्यवस्था आढळते ती इतर कोणत्याही प्राचीन स्थळावर आढळत नाही. यामध्ये सगळीकडे मार्बल टाईल्स लावण्यात आल्या आहेत. तसेच इथे वॉटरप्रूफ प्लास्टरऐवजी लाल रंगाच्या ब्रैकिया मार्बल्स लावण्यात आल्या होत्या. हे ठिकाण पाहून तिथल्या भव्यतेचा अंदाज येतो.
कुस्करलेल्या द्राक्षाचा लगदा आणखी दाबण्यासाठी दोन मोठ्या मेकॅनिकल लीव्हर प्रेसदेखील आहेत. दोन्ही ठिकाणी, द्राक्षे कुस्करून आणि दाबून काढलेला रस एका आयताकार व्हॅटमध्ये जातो, जिथे सम्राट गॉर्डियनच्या नावाचा शिक्का दिसतो. यावरून या जागेच्या बांधकामाची तारीख कळते. यानंतर, द्राक्षाचा रस कारंज्याप्रमाणे सुमारे एक मीटर उंच एका मास्कद्वारे ओतला जात असेल. तो एका रोमन निम्फेमसारखा दिसतो. द्राक्षाचा रस येण्या-जाण्यासाठी लेडच्या पाईपने बनलेली एक अंडरग्राऊंड सिस्टीम लावलेली आहे. तिथून हा रस 16 मातीच्या भांड्यांमध्ये टाकला जायचा. ते भांडे एका माणसाएवढे होते. अशा 8 घागरींचे अवशेष उत्खननादरम्यान सापडले आहेत.