Yak X Discovery | हिमयुगातील ‘याक एक्स’चा शोध 
विश्वसंचार

Yak X Discovery | हिमयुगातील ‘याक एक्स’चा शोध

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : हिमयुगात सायबेरियाच्या विस्तीर्ण गवताळ प्रदेशात लोकरी मॅमथ आणि लोकरी गेंड्यांसारखे महाकाय प्राणी वावरत होते. याच काळात आधुनिक याकचा एक अज्ञात नातेवाईकही या प्रदेशात अस्तित्वात होता, असा महत्त्वपूर्ण शोध संशोधकांनी लावला आहे. ‘याक एक्स’ असे तात्पुरते नाव देण्यात आलेल्या या नामशेष सस्तन प्राण्याचे अस्तित्व सायबेरियातील गुहेत सापडलेल्या हाडांच्या लहान तुकड्यांच्या डीएनए विश्लेषणातून उघड झाले आहे.

रशियातील दक्षिण सायबेरियाच्या अल्ताई पर्वतरांगांमधील ‘डेनिसोव्हा’ गुहेत महत्त्वाचे अवशेष मिळाले. याच गुहेतून डेनिसोव्हन या मानवाच्या नामशेष नातेवाईकांचे अवशेष प्रथम सापडले होते. संशोधकांनी याक एक्सचे असल्याचे मानले जाणारे २० हाडांचे तुकडे तपासले. त्यापैकी १४ तुकडे डेनिसोव्हा गुहेत, तर सहा तुकडे परिसरातील अन्य ठिकाणी सापडले होते. हाडांचे तुकडे अत्यंत लहान आणि मोडकळीस आलेले असल्यामुळे केवळ त्यांच्या आकारावरून प्राण्याची ओळख पटवणे शक्य नव्हते. मात्र, प्राचीन डीएनएच्या विश्लेषणातून हे अवशेष ज्ञात असलेल्या जिवंत किंवा नामशेष गोवंशीय प्रजातींपेक्षा वेगळ्या प्रजातीचे असल्याचे स्पष्ट झाले. हे संशोधन ‘करंट बायोलॉजी’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. स्वीडनमधील उत्क्रांतीविषयक आनुवंशिकताशास्त्रज्ञ लव्ह डालॅन यांच्या मते, आधुनिक याकच्या पूर्वजांपासून याक एक्सची उत्क्रांतीची शाखा सुमारे चार लाख वर्षांपूर्वी वेगळी झाली असावी.

मॅमथच्या गवताळ प्रदेशात वास्तव्य

याक एक्सचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तो बायसनपेक्षा आधुनिक याकसारखा दिसत असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे. आधुनिक याकप्रमाणे त्याचे शरीर मजबूत, लांब केसांनी झाकलेले आणि खांद्याजवळ उंचवटा असलेले असण्याची शक्यता आहे. हिमयुगात सायबेरियातील मोठा भूभाग ‘मॅमथ स्टेपी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्तीर्ण गवताळ परिसंस्थेचा भाग होता. येथे स्टेपी बायसन, ऑरॉक्स, मॅमथ, लोकरी गेंडे आणि घोडे यांच्यासह गुहेतील तरस आणि तपकिरी अस्वलेही राहत होती. डेनिसोव्हन मानवांनी याक एक्सची शिकार केली असण्याची शक्यताही संशोधकांनी व्यक्त केली आहे.

२७ हजार वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्व

अभ्यासातील सर्वांत जुना नमुना सुमारे दोन ते अडीच लाख वर्षांपूर्वीचा, तर सर्वांत अलीकडचा नमुना सुमारे २७ हजार वर्षांपूर्वीचा आहे. सुमारे एक लाख २० हजार वर्षांपूर्वीच्या उष्ण काळात या प्राण्यांची संख्या घटली असावी, असे आनुवंशिक पुरावे सूचित करतात. त्यानंतर काही काळात ही प्रजाती नामशेष झाली; मात्र नेमके कधी आणि कोणत्या कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT