Black Hole Discovery | आकाशगंगेपेक्षाही वजनदार महाकाय कृष्णविवराचा शोध! 
विश्वसंचार

Black Hole Discovery | आकाशगंगेपेक्षाही वजनदार महाकाय कृष्णविवराचा शोध!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांना विश्वातील एका अत्यंत दुर्मीळ आणि टोकाच्या स्थितीचा शोध लागला आहे. एका संशोधनात स्वतःच्याच आकाशगंगेपेक्षा कितीतरी पटीने महाकाय असणारे एक कृष्णविवर आढळून आले आहे. आजच्या आधुनिक विश्वातील महाकाय कृष्णविवरांची निर्मिती नेमकी कशी झाली असावी, याच्या गूढ रहस्यांवरून पडदा उठवण्यास हा शोध अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

विज्ञानाचे प्रसिद्ध नियतकालिक ‘नेचर’ मध्ये 27 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांनी विश्वाच्या निर्मितीनंतर अवघ्या 700 दशलक्ष (70 कोटी) वर्षांनंतर अस्तित्वात आलेल्या एका ‘लिटिल रेड डॉट’ मधील कृष्णविवराच्या वस्तुमानाचे थेट मोजमाप केले आहे. या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे; हे कृष्णविवर त्याच्या मूळ आकाशगंगेच्या तुलनेत प्रचंड मोठे आहे. याचा अर्थ, त्या आकाशगंगेचा पूर्ण विकास होण्याआधीच या कृष्णविवराची निर्मिती झाली असावी.

‘लिटिल रेड डॉटस्’ हा सुरुवातीच्या विश्वात आढळणार्‍या अत्यंत रहस्यमय खगोलीय वस्तूंचा एक वर्ग आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने 2023 मध्ये घेतलेल्या फोटोंमध्ये Abell2744- QSO1 (किंवा संक्षिप्तपणे ‘QSO1’) नावाचा असाच एक लाल ठिपका शोधून काढला होता. हा बिंदू अत्यंत संकुचित होता आणि त्याच्या केंद्रात एक सक्रिय कृष्णविवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. याआधी, या कृष्णविवराच्या वजनाबद्दल शास्त्रज्ञांमध्ये मोठे मतभेद होते. मात्र, नवीन संशोधनात शास्त्रज्ञांनी केंद्रापासून वेगवेगळ्या अंतरावर वायू किती वेगाने फिरतो, याचा थेट अभ्यास करून या कृष्णविवराचे अचूक वजन मोजले आहे.

‘लिटिल रेड डॉटमधील कृष्णविवराचे अशा प्रकारचे थेट मोजमाप करण्याची ही पहिलीच वेळ आहे,’ अशी माहिती केंबि—ज विद्यापीठाच्या काव्हली इन्स्टिट्यूट फॉर कॉस्मॉलॉजीमधील संशोधक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक इग्नास जुओडझबालिस यांनी दिली. यापूर्वीच्या अप्रत्यक्ष अंदाजांनुसार, ‘QSO1’ या कृष्णविवराचे वस्तुमान सूर्याच्या वजनापेक्षा तब्बल 4 कोटी पट जास्त असल्याचे मानले गेले होते. एखादे कृष्णविवर त्याच्या सभोवतालच्या परिसरापेक्षा जितके मोठे असते, तितकाच त्याचा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जास्त असतो. या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे शास्त्रज्ञांना त्याच्या जवळील वायूच्या हालचालींवरून त्याचे अचूक वजन मोजणे सोपे झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT